राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. शिवाय, मागील काही दिवसांपासून सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या देखील घडत आहेत. यावरून विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरणं सुरू केलं आहे. तर, याप्रकरणी तोडगा काढणयासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती देखील गठीत करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) काँग्रेसकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना काँग्रेसच्या भूमिकेबाबत माहिती दिली. तसेच, यावेळी त्यांनी अन्य मुद्द्य्यांवरून केंद्र सरकार, भाजपावर देखील टीका केली.
नाना पटोले म्हणाले, “आपल्या राज्यात जेवढी काही महामंडळं आहेत, तिथल्या कर्मचाऱ्यांना शासनसेवेत घेतलं गेललं आहे. एसटी सारख्या महत्वपूर्ण महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखील, सातत्याने त्यांच्यावर होणारा अन्याय पाहता, या विषयात देखील निश्चितपणे मार्ग निघायला हवा होता. त्यामुळे प्रवाशांना देखील मोठा त्रास झाला आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या परिवाराला देखील या दिवाळीत, त्यांची काळी दिवाळी झाली. पण आजच मला कानावर आलं की मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून, त्यांच्या विलिनीकरणाबाबत राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू झालेला आहे. ही स्वागतार्ह बाब आहे. खरंतर ज्यावेळी या संघटनेच्यासोबत बैठक झालेली होती. त्यांच्या सर्व मागण्या राज्य शासनाकडून पूर्ण करण्यात आलेल्या होत्या. परंतु, अशाप्रकारे राज्यात उलथापालथ करायची आणि कुणाला तरी भडकावायचं अशा पद्धतीची राजकारणाची पद्धत आपल्या राज्यात जी सुरू झालेली आहे. हे देखील अशा दिवाळीच्या काळात होता कामानये. जे झालं ते निश्चत चुकीचं झालं, हे मान्य करून राज्य शासनाने तातडीने एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढले पाहिजेत, ही भूमिका काँग्रेसची आहे.”
राज्य सरकारच्या असंवेदनशीलपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या – दरेकर
तसेच, “केंद्र सरकारने कृत्रिम महागाई वाढवली असा आक्षेप घेत सातत्याने काँग्रेसकडून आंदोलनाद्वारे भूमिका मांडली गेली. ज्या पद्धतीने पोटनिवडणुका झाल्या आणि भाजपाचा जे अमरपट्टा घेऊन आल्यासारखं वाटत होतं, की आम्ही काही पाप केले तरी आम्हाला कुणी हरवू शकत नाही. पण भारतातील लोकशाही किती मजबूत आहे, त्याचं दर्शन जेव्हा त्यांना झालं. तेव्हा एकदम डिझेल दहा रुपयांनी व पेट्रोल पाच रुपये कमी केलं. कालपर्यंत भाजपाचे लोक सांगत होते की काँग्रेसने हे सगळं करून ठेवलं आणि आम्हाला याच्या किंमती कमी करता येत नाहीत. असे हे खोटारडे लोक आज लोकांनी त्यांना पटकलं म्हणून उलट्या बोंबा करायची त्यांची सवय आहे.” असं देखील पटोले यांनी सांगितलं.
किरीट सोमय्या यांनी काँग्रेस नेत्यांकडे मोर्चा वळवला असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, “किरीट सोमय्या यांनी हाती घेतलेल्या मुद्द्य्यांपैकी एकाही मुद्द्यावर ते यशस्वी झाले का? केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभरातील लोकांना जे भोगावं लागत आहे. सर्व प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी अशाप्रकारचं हे मनोरंजन कृत्य भाजपाच्या माध्यमातून जे केलं जातय. त्यावर आता सगळ्या स्तरातून टीका होत आहे. भुजबळांचं सगळ्यात मोठं उदाहरण आमच्या समोर आहे. अडीच वर्षे एक वयोवृद्ध व राज्यातील राजकारणात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या एका व्यक्तीला या लोकांनी तुरूंगात डांबलं आणि जेव्हा ये प्रकरण न्यायालयात गेलं, न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडलं. यापेक्षा दुसरं आणखी काय उत्तर या लोकांना द्यावं. असे आरोप लावून या लोकांना बदनाम करण्याचं पाप व महाराष्ट हे भ्रष्टाचारी राज्य असल्याचं दाखवण्याची भूमिका दाखवण्याचा जो भाजपाकडून सातत्याने प्रयत्न सुरी आहे, त्यावर जनतेकडूनही आता निषेध नोंदवायला सुरूवात झाली आहे. ”