पुणे : सध्या बाजारामध्ये टोमॅटोला १०० रुपये किलोचा दर असून पेट्रोल डिझेलच्या प्रती लिटर दरापुढे टोमॅटो गेल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तर या दरवाढीचा फायदा एका बाजूला शेतकर्यांना होत आहे. तर याचा फटका सर्व सामान्य नागरिकांच्या खिशालादेखील बसत आहे. त्याचदरम्यान पुण्यातील चंदननगर भागातील वडगावशेरी येथील भाजी मार्केटमध्ये टोमॅटोच्या दरावरून विक्रेता आणि ग्राहकांमध्ये हाणामारीची घटना घडली आहे.
अनिल गायकवाड असे आरोपी विक्रेत्याचे नाव असून गोपाल ढेपे असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास गोपाल ढेपे हे वडगावशेरी येथील भाजी मार्केटमध्ये टोमॅटो खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी २० रुपये पावशेर असा भाव आरोपी अनिल गायकवाड यांनी गोपाल ढेपेंना सांगितला. टोमॅटो खूपच महाग म्हटल्यावर गोपाल ढेपे आणि आरोपी गायकवाड या दोघांमध्ये वाद सुरू झाला.
हेही वाचा – पिंपरीत लेडीज टेलरचे दहा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे; नागरिकांनी दिला चोप
त्याचदरम्यान तक्रारदार ढेपे यांच्या तोंडावर वजन काट्यातील वजन अनिल गायकवाड यांनी फेकून मारले. यामध्ये गोपाल ढेपे जखमी झाले आहे. या मारहाण प्रकरणी अनिल गायकवाड यांच्या विरोधात गोपाल ढेपे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे चंदननगर पोलिसांनी सांगितले.