पुणे : आळंदी रस्त्यावरील कळस गावठाणात वैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. हाणामारीत चौघे जखमी झाले असून, याप्रकरणी परस्परविराेधी फिर्यादीवरुन सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुल भीष्मा चव्हाण (वय २४, रा. कळस ) याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीनुसार रोहित लोखंडे (रा. दिघी), गगन लाड (रा. टिंगरेनगर) आणि स्वप्नील महाजन (रा. कळस) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा… पुणे : नवले पूलावर अपघात; एक ठार

चव्हाण सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कळस गावातील स्मशानभूमीजवळून निघाला होता. त्यावेळी रोहित लोखंडे, गगन लाड यांनी त्याला बेदम मारहाण केली. त्याच्यावर चाकू आणि गजाने हल्ला करण्यात आला. मारहाणीत चव्हाण जखमी झाला, असे चव्हाणने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. रोहित उमेश लोखंडे (वय १९, रा. दिघी) याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. रोहित हा त्याचा मित्र विशाल नरेंद्र गायकवाड (रा. कळस) याची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी राहुल आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला. याप्रकरणी तिघांविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.