लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याची घटना बुधवारी घडली. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) धर्तीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही विद्यार्थी संघटनांमधील तीव्र संघर्ष समोर आला.
आणखी वाचा-कात्रज पोलीस चौकीत तृतीयपंथीयांचा राडा; पोलिसांना धक्काबुक्की
विद्यापीठाच्या भोजनगृहाजवळ हा प्रकार घडला. विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सदस्य नोंदणीवरून स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि अभाविप यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर मारामारीत झाले. त्यात एका विद्यार्थ्याला दुखापत झाली. या मारामारीनंतर विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांकडून दोन्ही संघटनांची बाजू ऐकून घेण्यात येत असल्याची माहिती विद्यापीठातील सुरक्षा विभागाकडून देण्यात आली. मात्र या मारामारीमुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दिल्लीतील जेएनयूमध्ये विद्यार्थी संघटना एकमेकांना भिडण्याच्या घटना गेल्या काही वर्षांत घडल्या आहेत. तसाच प्रकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडल्याचे दिसून आले.