पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या ८ जूनपासून अर्जाचा भाग दोन म्हणजे महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरावे लागणार आहेत. प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत सुमारे ४५ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. येत्या १९ जून रोजी प्रवेशाची निवड यादी प्रसिद्ध केला जाणार असून, निवड यादीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना १९ ते २२ जून दरम्यान महाविद्यालयात प्रवेश घेता येईल.
हेही वाचा >>> पुणे : राज्य शैक्षणिक आराखडा निर्मितीसाठी ३२ सदस्यांची ‘जम्बो’ सुकाणू समिती
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया या पूर्वीच सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रियेत कोटांतर्गत प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता नियमित केंद्रीय फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार अकरावी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना १२ जूनपर्यंत अर्जाचा भाग एक भरता येईल. तर विद्यार्थ्यांना अर्जातील भाग दोन म्हणजेच महाविद्यालयांचे पसंतीक्रम १५ जूनपर्यंत भरता येणार आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेल्या माहितीच्या आधारे १९ जूनला महाविद्यालयांची प्रवेशासाठी निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादितील विद्यार्थ्यांना १९ ते २२ जून या कालावधीत आपले प्रवेश निश्चित करावे लागणार आहे. त्यानंतर रिक्त जागा प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. साधारण २३ जूनपासून प्रवेशाची दुसरी फेरी, १ जुलै ते ९ जुलै दरम्यान तिसरी फेरी, १० ते १८ जुलै दरम्यान विशेष फेरी होईल, अशी माहिती शिक्षण सहसंचालक हरून आतार यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी https://pune.11thadmission.org.in/ या दुव्यावर उपलब्ध आहे.
– प्रवेश निश्चित करण्यापूर्वी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक
– पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य.
– प्रवेश न घेतल्यास पुढील फेरीतील प्रवेशासाठी प्रतिबंध – पहिल्या पसंती व्यतिरिक्त महाविद्यालय मिळाल्यास पुढील फेरीची वाट पाहणे शक्य