लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसच्या टपावरुन पडल्याने मदतनीस (क्लिनर) तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गणेशखिंड रस्त्यावर घडली. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी बसचालकाला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली.

संकेत देवीदास चैलवाल (वय २९, रा. मासोद, जि. अमरावती) असे मृत्युमुखी पडलेल्या क्लिनरचे नाव आहे. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी पोलिसांनी खासगी बसचालक बबलू हमीदमियाँ मक्तेवाले (वय ३३, रा. हुडगी, जि. बिदर, कर्नाटक) याला अटक करण्यात आली. याबाबत पोलीस कर्मचारी विकास इंगळे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणारी बस गणेशखिंड रस्त्याने शुक्रवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास मुंबईहून हैद्राबादकडे निघाली होती. गणेशखिंड रस्त्यावरील वैकुंठभाई मेहता संस्थेजवळ कमान आहे. कमानीजवळ लटकणारी वायर बसच्या टपावर अडकल्याने बसमधील मदतनीस संकेत याला बसचालक बबलू याने टपावर अडकलेली वायर काढण्यास सांगितले.

बसचालक बबलू याने गणेशखिंड रस्त्यावर बस थांबविली. संकेत टपावर चढला. बस कमानीतून बाहेर नेत असताना बसचालक बबलू याने अचानक जोरात ब्रेक दाबला, टपावर चढलेला संकेत तोल जाऊन रस्त्यात पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. संकेतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता.

चौकशीत बसचालक बबलूने बसचा ब्रेक दाबल्याने टपावरुन पडल्याची माहिती मिळाली. अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी बबलू याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील तपास करत आहेत.

Story img Loader