लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यातील शिक्षण विभागाच्या अखत्यारितील कार्यालयांमध्ये शनिवारी (८ मार्च) विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचा आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी दिला आहे. मात्र, ही मोहीम शनिवारी सुटीच्या दिवशी राबवावी लागणार असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, ‘क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा सातकलमी कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार सर्व क्षेत्रीय शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक आहे. कृती आराखड्यात स्वच्छता या मुद्द्यांतर्गत करावयाच्या कामांसाठी कार्यालयांमध्ये ८ मार्च रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबवावी. शिक्षण उपसंचालकांनी कार्यालयांचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल सादर करावा. तसेच, प्राथमिक शिक्षण संचालक आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी त्यांच्या स्तरावर सूचना देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.’

एरवी कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे स्वच्छता करण्यासाठी वेळ मिळत नाही. शनिवारी व्यवस्थितपणे स्वच्छतेचे काम करणे शक्य आहे. अन्य कार्यालयांप्रमाणे आयुक्त कार्यालयातही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे, असे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी नमूद केले.

Story img Loader