पुणे : वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेच्या (सेट) निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे. या परीक्षेसाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) आरक्षण लागू केले जाणार असून, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट विभागातर्फे गोवा आणि महाराष्ट्र राज्यात सेट परीक्षा घेतली जाते. त्यानुसार ७ एप्रिल २०२४ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी मराठा आरक्षण लागू करण्याबाबतची मागणी काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे केली होती. त्यावर विद्यापीठाने राज्य शासनाकडे अभिप्राय मागवला होता. त्यावर राज्य शासनाने त्यावरील निर्णय विद्यापीठाला कळवला आहे. त्यानुसार परीक्षेस ‘सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास संवर्गाकरिता अधिनियम २०२४’ मधील तरतुदीनुसार एसईबीसी आरक्षण लागू करण्यात येणार आहे. आरक्षण लागू केल्यानंतरही मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रीट याचिका व अन्य निर्णयाच्या अधीन राहून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा – पिंपरी : घरफोडीच्या पैशांतून मध्य प्रदेशातून खरेदी केल्या पिस्तुल; घरातच झाडल्या गोळ्या
विद्यापीठाने एसईबीसी आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले होते. मात्र राज्यातील विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे व काही विद्यार्थ्यांना मुदतीत अर्ज भरणे शक्य न झाल्यामुळे विद्यापीठाच्या सेट विभागाने २७ व २८ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. आता परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा १ लाख ९ हजार २५० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे आता उमेदवारांचे निकालाकडे लक्ष लागले आहे.