शिवाजीनगर दिवाणी न्यायालयातील कर्मचाऱ्याला (बेलिफ) एक हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी पकडले.लक्ष्मण नथू काळे (वय ४०) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी काळे याच्यासह आाणखी एकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> जालन्यातील लाठीमाराच्या घटनेनंतर पुण्यातील बंदोबस्तात वाढ
तक्रारदार महिलेने जमिनीच्या वादासंदर्भात शिवाजीनगर न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यात प्रतिवादी व्यक्तीला न्यायालयाने हजर राहण्यासाठी समन्स बजाविण्याची जबाबदारी काळे याच्यावर सोपविण्यात आली होती. समन्स वेळेत बजावून याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी काळे याने महिलेकडे एक हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात सापळा लावून काळे याला महिलेकडून एक हजार रुपयांची लाच घेताना पकडले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा >>> राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा; १०८ शिक्षक मानकरी
महावितरणच्या सहायक अभियंत्याला अटक
विद्युत ठेकेदाराकडून ५० हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या बाणेर कार्यालयातील सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. बाणेर येथील महावितरणच्या उपकेंद्रात ही कारवाई करण्यात आली. रवींद्र नानासाहेब कानडे (वय ३७) असे अटक करण्यात आलेल्या सहायक अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदार ठेकेदाराने शासकीय योजनेतील विद्युत काम केले होते. पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी कानडे याने ठेकेदाराकडे लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पडताळणी करण्यात आली. सापळा लावून कानडेला पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर तपास करत आहेत.