पिंपरी-चिंचवड भागात निवडणूक लढवणाऱ्या एका इच्छुकाकडून मतदारांची नावे कायम करण्यासाठी दोन लाख रूपयांची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. थेरगाव येथील मतदार नोंदणी कार्यालयाच्या आवारात मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. पहिला हप्ता म्हणून ५० हजारांची लाच लिपिकाने स्वीकारली. त्याने लाचेपोटी दोन हजार रूपयांच्या १५ नोटा घेतल्याचे उघड झाले आहे. एसीबीने त्याच्याकडून नवीन नोटांसह ५० हजारांची रक्कम जप्त केली.
प्रल्हाद उत्तम पाटील (वय ४१) असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे. थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुलात चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठीचे मतदार नोंदणी कार्यालय आहे. काळेवाडी-विजयनगर प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या एका इच्छुकाने ३०० मतदार नोंदणी करण्यासाठी अर्ज दिला होता. नवीन मतदार नोंदणी करताना त्रुटी न काढता ३०० मतदारांची नावे नवीन यादीत समाविष्ट करण्यासाठी मतदार नोंदणी कार्यालयातील लिपिक पाटील याने इच्छुक उमेदवाराकडे २ लाख ४० हजार रूपये लाच मागितली. पहिला हप्ता म्हणून ५० हजार रूपयांची मागणी केली होती.
त्यानंतर इच्छुक उमेदवाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदशनाखाली उपअधीक्षक जगदीश सातव, पोलीस निरीक्षक राजू चव्हाण आणि पथकाने सापळ लावून पाटील याला ५० हजारांची लाच स्वीकारताना पकडले. पाटील याच्याकडून १०० रूपयांच्या २०० आणि नवीन दोन हजाराच्या १५ नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा