हवामान बदल आणि डिजिटल परिवर्तन यासारख्या नव्या स्थितीला समर्थपणे तोंड देण्यास सज्ज उद्योग-व्यापारी संस्था उभी करणे हे सध्याच्या काळात नेतृत्वपदी असलेल्या व्यक्तींसाठी सर्वात मोठे आव्हान आहे, असे मत प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी व्यक्त केले.इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या पुणे शाखेच्या वार्षिक संमेलनात डॉ. प्रमोद चौधरी बोलत होते. अमेरिकेच्या मुंबई वाणिज्य दूतावासातील उपमुख्य अधिकारी स्कॉट टिकनर यांच्या हस्ते कार्यक्रमात जैवइंधन क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. चेंबरच्या पुणे शाखेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोटस्थाने, पश्चिम विभागीय कार्यालयाचे प्रमुख सौरभ शहा या वेळी उपस्थित होते.
चौधरी म्हणाले,की ऊर्जा वापराचे नवे मार्ग शोधणे आणि त्यांचे अवलंबन करणे ही आता ऐच्छिक गोष्ट उरली नसून, ती एक जबाबदारी झाली आहे. खनिज तेलासारख्या पारंपरिक ऊर्जास्रोतांकडून पुनर्वापर योग्य ऊर्जा किंवा जैविक ऊर्जा वापराचा पर्याय स्वीकारण्यासाठी आवश्यक बदल सर्वच क्षेत्रातील नेतृत्व करण्याऱ्यांनी अंगीकारला पाहिजे.
स्कॉट टिकनर म्हणाले,की भारत-अमेरिका संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांत खूप सकारात्मक बदल होत आहेत. उभय देशातील व्यापार २०३० पर्यंत ५०० अब्ज डॉलर या पातळीला पोचावा या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत पर्यावरण रक्षण, सामाजिक लाभ आणि प्रामाणिक कार्यपद्धती या त्रिसूत्रीवर चालणाऱ्या व्यवसायांची गेल्या काही वर्षात पाचपट भरभराट झाली आहे.