पुणे : सध्या राज्यातील हवामानात झपाटय़ाने बदल होत असल्याचे आढळत असून मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ातील काही भागांत आकाश निरभ्र असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. ढगाळ वातावरणामुळे रात्रीच्या उकाडय़ात वाढ झाली आहे, तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाडय़ात पाऊसही कोसळत आहे. परतीच्या पावसाने विदर्भात थैमान घातले आहे.
विदर्भ आणि मराठवाडय़ात किमान तापमानात वाढ होऊन रात्रीच्या उकाडय़ात वाढ झाली आहे. येत्या दोन दिवसांत पुन्हा हवामानात बदल होऊन सर्वत्र पावसाळी स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.
गणेशोत्सवाच्या प्रारंभी राज्यात सर्वत्र तुरळक ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात बहुतांश ठिकाणी दिवसाच्या कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणावर वाढ नोंदविण्यात आली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातील कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ४ ते ५ अंशांनी वाढले. त्याचप्रमाणे रात्रीच्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानही सरासरीच्या पुढे गेल्याने रात्रीच्या उकाडय़ात वाढ झाली. राज्याच्या बहुतांश भागांत रविवारी दुपारपासूनच अंशत: ढगाळ वातावरण तयार झाल्याने गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत तापमानात काही प्रमाणात घट झाली असली, तरी विदर्भ वगळता अद्याप राज्याच्या बहुतांश भागांत तापमान ३० अंशांपुढे आहे.
विदर्भात बहुतांश भागांत आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी सध्या पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे रविवारी या भागांतील तापमानात मोठी घट दिसून आली. पावसामुळे विदर्भातील तापमान २५ ते २७ अंशांपर्यंत खाली आले. मात्र, रात्रीची ढगाळ स्थिती कायम असल्याने अकोला, अमरावती, बुलढाणा आदी भागांत रात्रीचा उकाडा कायम होता. मध्य महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, जळगाव आदी भागांत कमाल तापमानाचा पारा वाढलेला आहे. मुंबई परिसरातही सरासरीपेक्षा अधिक ३१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून, रात्रीचे किमान तापमान २६ अंशांपुढे पोहोचले आहे.
पुन्हा पावसाळी स्थिती
विदर्भ आणि मराठवाडय़ात सध्या काही भागांत पावसाची हजेरी आहे. या विभागातील काही भागांत आणखी दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ७ सप्टेंबरपासून पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातही बहुतांश भागांत पावसाळी स्थिती निर्माण होणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारांचा अंदाज आहे.
विदर्भाला पावसाने झोडपले
नागपूर : दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसाने उपराजधानीसह संपूर्ण विदर्भाला झोडपून काढले. शनिवारी दुपारपासूनच अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याने सात किंवा आठ तारखेपासून परतीच्या पावसाचा इशारा दिला होता. मात्र, तो खोटा ठरला. नागपूर, यवतमाळ, अमरावती, गोंदिया, अकोला, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत रविवारी सकाळी पावसाला सुरुवात झाली.