दत्ता जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : राज्यात १५ ऑक्टोबरला सुरू झालेला साखर हंगाम मंगळवारी, १८ एप्रिल रोजी आटोपला. २१० साखर कारखान्यांनी १०५ लाख टन साखर उत्पादन केले आहे. मागील वर्षांपेक्षा ३२ लाख टनांनी साखर उत्पादन घटले आहे. राज्यात मागील वर्षी १३७.२८ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा लागवडीखालील क्षेत्र गेल्या वर्षांएवढेच असल्यामुळे यंदा १३५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात साखर उत्पादन १०५ लाख टनांपर्यंतच होऊ शकले.

 राज्यातील उसाचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबर रोजी सुरू झाला होता. परतीचा मोसमी पाऊस लांबल्यामुळे गळीत हंगामाला दिवाळीनंतरच गती आली होती. १०६ सहकारी आणि १०४ खासगी अशा २१० साखर कारखान्यांनी या हंगामात साखर उत्पादन केले आहे. कोल्हापूर, सोलापूर, पुणे विभागातील बहुतेक कारखान्यांची धुराडी मार्चअखेरीस बंद झाली होती.

उत्पादन का घटले ?

यंदाच्या पावसाळय़ात जुलैअखेरपासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत सतत पाऊस पडत होता. सततच्या पावसामुळे उसाची अपेक्षित वाढ झाली नाही. अपेक्षित वजन, गोडी भरली नाही. राज्यात गेल्या वर्षांएवढेच १४८७ लाख हेक्टरवर यंदाही ऊस होता. मात्र, नव्याने लागवड केलेल्या आणि खोडवा उसाचे वजन सरासरीच्या पंधरा ते वीस टक्के कमी भरले आहे. सोलापूर, बीड, उस्मानाबाद विभागात वजनात मोठी तूट आली आहे.

राज्यातील सर्व कारखाने मंगळवारी बंद झाले आहेत. २१० कारखान्यांनी एकूण १०५ लाख टन साखर उत्पादन केले आहे. हवामान बदलामुळे उसाचे वजन कमी भरले आहे. कारखान्यांची एकूण दैनिक गाळपक्षमता आठ लाख टनांवर गेल्यामुळे हंगाम वेळेत संपला आहे.

– शेखर गायकवाड, साखर आयुक्त