पावलस मुगुटमल, लोकसत्ता
पुणे : बंगालच्या उपसागरातून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि कमी दाबाच्या पट्टय़ांनी बऱ्याचदा दिशा बदलल्याने यंदा देशात पावसाचे स्वरूप बदललेले आढळले. पावसाच्या या बदललेल्या स्वरूपामुळे देशाचा सर्वाधिक पावसाचा ईशान्येचा आणि उत्तरेचा भाग कोरडा राहिल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य भारत आणि दक्षिण भारताला मात्र पावसाच्या बदललेल्या स्वरूपाचा लाभ झाला. या भागांत यंदा जोरदार पाऊस कोसळला. दरवर्षी सर्वाधिक पाऊस होत असलेली ईशान्येकडील राज्ये आणि उत्तरेकडील बहुतांश भागांना मात्र पावसाच्या घटीचा फटका बसला. राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांमध्ये पावसाच्या प्रमाणात सरासरीच्या तुलनेत मोठय़ा प्रमाणावर घट झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीला जूनमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य भारतात पावसाचे प्रमाण कमी होते. या कालावधीत अरबी समुद्रातून पावसासाठी पोषक वारे प्रभावीपणे वाहू शकले नाहीत. या काळात बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र ईशान्य भारत आणि काही प्रमाणात उत्तरेपर्यंत पोहोचले होते. परिणामी, या भागात सुरुवातीला पावसाचे प्रमाण चांगले होते. त्यानंतर मात्र कमी दाबाच्या क्षेत्रांचा प्रवास बहुतांश वेळेला या भागाकडे झाला नाही. त्यामुळे पाऊस मागे पडत गेला.
बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र यंदा बहुतांश वेळेला पश्चिम बंगालजवळून ओदिशा, छत्तीसगडपासून थेट राजस्थाकडे गेले. बदललेल्या या दिशेमुळे मध्य भारतापासून राजस्थानपर्यंतच्या परिसराला पावसाचा लाभ झाला. अरबी समुद्रातून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास मध्य भारत आणि प्रामुख्याने दक्षिणेकडे झाला. महाराष्ट्रातील विदर्भासह मध्य भारतातील काही भागात बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातील कमी दाबाची क्षेत्रे पावसासाठी लाभदायक ठरली.
दक्षिणेकडेही दोन्ही प्रणालींच्या माध्यमातून पाऊस झाला. त्यामुळे मध्य भारत आणि दक्षिणेकडे पावसाचे प्रमाण वाढले.
या राज्यांत अधिक..
तमिळनाडूमध्ये सर्वाधिक ८१ टक्के, तेलंगणा ५६ टक्के, तर कर्नाटकात ४२ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत २३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आदी राज्येही पावसात पुढे आहेत.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रात जोरधारा
महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधारांचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असेल. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर आदी जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडय़ात दोन-तीन दिवस काही भागांत पावसाची शक्यता आहे.
या राज्यांत कमी..
सध्या उत्तर प्रदेश, मणिपूर या राज्यांत ४८ टक्के पाऊस उणा आहे. बिहारमध्ये ३६, तर दिल्लीत सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस कमी आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगड, झारखंड, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आदी राज्यांतही पाऊस सरासरी गाठू शकलेला नाही.
विदर्भात वृष्टी का?
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सध्या कार्यरत आहे. ते उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. त्यामुळे छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये पाऊस होत आहे. हे क्षेत्र विदर्भापासून जवळ असल्याने त्याचाच परिणाम म्हणून विदर्भात अनेक भागांत सोमवारी (१२ सप्टेंबर) पाऊस झाला.