हवामान खात्याकडून पावसाबाबत वारंवार चुकीचे अंदाज वर्तवले जात आहेत. या हवामान खात्याच्या भरवशावर राहून मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, मराठवाड्यात पुरेसा पाऊस न झाल्याने शेतातली पिकं करपून गेली आहेत. त्यामुळे करोडो रुपये हवामान खात्यावर खर्च करण्यापेक्षा हे खातंच बंद करावं, अशी मागणी संतापलेल्या शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाचा चुकीचा अंदाज वर्तवणाऱ्या हवामान खात्याला जाब विचारण्यासाठी मराठवाड्यातील काही शेतकरी सोमवारी पुण्यातील हवामान खात्याच्या कार्यालयावर येऊन धडकले. यावेळी हातात करपलेली पिकं घेऊन या शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने ठिय्या आंदोलन करीत विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याच्या घोषणाही दिल्या. दरम्यान, हवामान कार्यालयाने शेतकऱ्यांच्या मागण्या दिल्लीकडे पाठवल्याचे लेखी स्वरूपात सांगितले. तसेच शेतकऱ्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त केली.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस होईल, असा अंदाज पुण्याच्या हवामान खात्याने पावसाळ्यापूर्वी वर्तवला होता. मात्र, आता संपूर्ण पावसाळ्याचा मोसमही निघून गेला मात्र, मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळाचे सावट कायम असल्याचे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष भाई थावरे म्हणाले, यंदा हवामान खात्याने मराठवाड्यात चांगला पाऊस होईल असे सांगितलेले अंदाज चुकले आहेत. या अंदाजानुसार आम्ही पेरणी केली मात्र, पाऊस न पडल्याने आमची सगळी पिकं करपून गेली आहेत. त्यामुळे खोटे अंदाज वर्तवणे हवामान खाते बंद करावे. पूर्वी लोक आकाशाकडे बघून पाऊस पडेल की नाही हे सांगत, तेच आम्हाला आता योग्य वाटतंय, अशी भावनाही त्यांनी शेतकऱ्यांच्यावतीने व्यक्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Close the india meteorological department angry farmers appeal to the government which gives false forecasting of rain
Show comments