राज्यात नागरी हवाई वाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधेची उपलब्धता, तसेच उपयुक्त क्षमता पाहता या क्षेत्रात विकासाची मोठी संधी आहे. बंद असलेले विमानतळ तातडीने सुरू झाल्यास या शहरांमधील बाजारपेठा मुख्य प्रवाहात येण्यासाठी फायदा होईल, असा विश्वास हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर व्यक्त करतात. त्यांच्याशी विनय पुराणिक यांनी साधलेला हा संवाद.

● हवाई क्षेत्रात महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे?

दशकभरापूर्वी महाराष्ट्रात विमान कंपन्यांना आपल्या बाजूने आकृष्ट करण्यासाठी आणि आवश्यक व्यवहार्यता सुनिश्चित करण्यासाठी आसनेदेखील आरक्षित करून देण्याची हमी (अंडरराईट्स) सरकारला द्यावी लागली होती. त्यामध्ये विमानातील आसनांचे ७५ टक्के आरक्षण झाले नाही, तर महाराष्ट्र सरकार त्यांना भरपाई देईल, या धोरणानुसार महाराष्ट्राने वाटचाल सुरू केली. मात्र, सरकारने स्टार्टअप, मेट्रो, स्मार्ट सिटी, मेक इन इंडियासारखे प्रकल्प राबवून शहरांमधील उद्याोग, विकासाला चालना देत नागरी हवाई वाहतूक क्षेत्राचा नियोजनबद्ध व शाश्वत विकास करण्यास सुरुवात केली. आजमितीस देशात सर्वांत जास्त विमानतळ व धावपट्ट्या महाराष्ट्रात आहेत. येथे ४० पेक्षा अधिक विमानतळ आणि धावपट्ट्या आहेत. भविष्यातील गरज पाहता, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धरणे, तलाव व नदीमध्ये वॉटर एअरोड्रोम विकसित करता येणे शक्य आहे. असे केल्यास राज्यातील पर्यटन व उद्याोगांना आणखी चालना मिळेल.

● महाराष्ट्रातील हवाई वाहतुकीची परिस्थिती बदलली आहे का?

सुमारे १५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील हवाई वाहतूक केवळ मुंबई, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चार विमानतळांपुरती होती. लहान शहरांना जोडण्यासाठी सरकारने अधिक गांभीर्याने प्रयत्न सुरू केले. राज्यात सध्या मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, शिर्डी, जळगाव, सिंधुदुर्ग, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड या शहरांतून विमानसेवा सुरू झाली आहे, तर सोलापूर, अकोला, रत्नागिरी, धुळे, अमरावती, नाशिक (मध्य) या विमानतळांवरून उड्डाणांची प्रतीक्षा आहे. सध्या ६० लाख ते ६५ लाख प्रवासी हवाई वाहतुकीचा लाभ घेतात. त्यापैकी बहुतांश मुंबई आणि पुणे विमानतळावरून प्रवास करतात. पुण्यासाररख्या शहरातून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

● महाराष्ट्राला वाढत्या हवाई क्षेत्राचा फायदा कसा होऊ शकतो?

राज्यात नागरी हवाई वाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधेची उपलब्धता, तसेच उपयुक्त क्षमता पाहता या क्षेत्रात विकासाची मोठी संधी आहे. बंद असलेले विमानतळ तातडीने सुरू झाल्यास या शहरांमधील बाजारपेठा मुख्य प्रवाहात येण्यासाठी फायदा होईल. वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, परकीय गुंतवणूक व उद्याोगांमुळे वाढत असलेली आर्थिक उलाढाल, पर्यटन, मध्यमवर्गीयांची वाढती लोकसंख्या आणि परकीय गुंतवणुकीमुळे दिवसागणिक हवाई प्रवासाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

● भविष्यात कोणते बदल अपेक्षित आहेत?

भारतातील हवाई प्रवासाच्या मागणीत सतत वाढ होत आहे. प्रत्येक राज्याने हवाई वाहतुकीचे महत्त्व ओळखून जास्तीत जास्त विमानतळ विकसित करून शहरांना जोडणारी व आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्यासाठी स्पर्धा सुरू केली आहे. त्यामळे प्रामुख्याने हवाई प्रवाशांना पायाभूत सुविधांचा विकास, विस्तार, आधुनिकीकरण करणे, प्रवाशांना प्रवासाचा सुखद व आरामदायी अनुभव देण्यासाठी विमानतळ व विमान कंपन्यांकडून कार्यक्षमता वाढवण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा, डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब वाढवणे, शाश्वत विमान इंधन, इलेक्ट्रिक, हायब्रीड विमान, हेलिकॉप्टर व ड्रोन्सचा हवाई वाहतुकीसाठी वाढता वापर होणे अत्यंत गरजेचे आहे. विमानतळ धावपट्टीच्या विस्तारापासून, पायाभूत सुविधांबरोबरच द्वितीय, तृतीय श्रेणीतील शहरांमधून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे वाढवावी. विमानाची दुरुस्ती-देखभाल, वैमानिक, एअरक्राफ्ट इंजिनीअर, कर्मचारी प्रशिक्षण संस्था यांवर भर देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आवश्यक संसाधने, कष्टाळू व कुशल मनुष्यबळही महाराष्ट्रात सहज उपलब्ध असून, ठोस कृती योजना आराखडा तयार करावा. पर्यावरणपूरक कार्यपद्धतीचा अवलंब करण्यावर मोठा भर देणे गरजेचे आहे. पुरंदर विमानतळासारखे प्रकल्प अनेक दशकांपासून रखडले आहेत. हे प्रकल्प मार्गी लागल्यास पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा कायापालट होईल.

vinay. puranik@expressindia. com