पुण्यात ढगफुटी होऊन मुसळधार पाऊस पडणार असल्याची अफवा पसरल्याने गुरुवारी शहर आणि उपनगरात काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वॉट्सअप आणि सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांमुळे ढगफुटी होणार असल्याची अफवा वेगाने पसरली.
पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होतो आहे. पुण्यात जुलैमध्ये आतापर्यंत २८६ मिमी इतका पाऊस पडला आहे. पावसाने जुलै महिन्यांची सरासरी ओलांडली आहे. त्यातच मुसळधार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील माळीण गावामध्ये दरड कोसळल्याने लोकांच्या मनातील भीतीत आणखी भर पडली. अनेकांनी ढगफुटीच्या अफवेवर विश्वास ठेवून आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना काळजी घेण्याचे आणि घरातच थांबण्याची सूचनाही केली. वास्तविक वेधशाळेकडून ढगफुटीचा कोणताही अंदाज देण्यात आलेला नाही. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र ढगफुटी होण्याची कोणतीही शक्यता वेधशाळेने वर्तविलेली नाही. या अफवेमुळे पुण्यातील हिंजवडी भागातील काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱयांना लवकर घरी जाण्याची मुभा दिल्याचीही माहिती मिळाली आहे.
ढगफुटीच्या अफवेने पुण्यात गोंधळात गोंधळ
पुण्यात ढगफुटी होऊन मुसळधार पाऊस पडणार असल्याची अफवा पसरल्याने गुरुवारी शहर आणि उपनगरात काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
First published on: 31-07-2014 at 05:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cloudburst rumour in pune city