पुण्यात ढगफुटी होऊन मुसळधार पाऊस पडणार असल्याची अफवा पसरल्याने गुरुवारी शहर आणि उपनगरात काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वॉट्सअप आणि सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांमुळे ढगफुटी होणार असल्याची अफवा वेगाने पसरली.
पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होतो आहे. पुण्यात जुलैमध्ये आतापर्यंत २८६ मिमी इतका पाऊस पडला आहे. पावसाने जुलै महिन्यांची सरासरी ओलांडली आहे. त्यातच मुसळधार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील माळीण गावामध्ये दरड कोसळल्याने लोकांच्या मनातील भीतीत आणखी भर पडली. अनेकांनी ढगफुटीच्या अफवेवर विश्वास ठेवून आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना काळजी घेण्याचे आणि घरातच थांबण्याची सूचनाही केली. वास्तविक वेधशाळेकडून ढगफुटीचा कोणताही अंदाज देण्यात आलेला नाही. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र ढगफुटी होण्याची कोणतीही शक्यता वेधशाळेने वर्तविलेली नाही. या अफवेमुळे पुण्यातील हिंजवडी भागातील काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱयांना लवकर घरी जाण्याची मुभा दिल्याचीही माहिती मिळाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा