लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : होळीनिमित्त खराडीतील इव्हा गार्डन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या गायक रितविज याच्या संगीत रजनीत गोंधळ उडाला. मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अचानक गर्दी वाढल्याने बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने अनर्थ टळला.
होळीनिमित्त खराडीतील मेफिल्ड इव्हा गार्डन मैदानावर प्रसिद्ध गायक रितविज याचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने तरुण-तरुणींची गर्दी झाली होती. दुपारी दीड वाजल्यापासून तेथे गर्दी झाली होती. कार्यक्रमस्थळी आयोजकांनी सुरक्षारक्षक तैनात केले होते, तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मैदानाच्या चारही बाजूला पत्र्याचे कुंपण उभे करण्यात आले होते. प्रवेशद्वारातून कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या तरुण-तरुणींना प्रवेश देण्यात येत होता. गर्दी वाढल्याने प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. अचानक गर्दी वाढल्याने गोंधळ उडाला. तरुण-तरुणींनी प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. चेंगराचेंगरी होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करुन परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
होळीनिमित्त खराडी भागात पंजाबी गायक हनी सिंग याच्या कार्यक्रमाचे आयोजन महालक्ष्मी लॉन येथे करण्यात आले होते, तसेच इव्हा गार्डन येथे रितविज याच्या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले होते. इव्हा गार्डनच्या प्रवेशद्वारात मोठी गर्दी झाली होती. प्रवेश मिळवण्यासाठी तरुण-तरुणींनी दरवाजा उघडला. त्यावेळी गोंधळ उडाला. चेंगराचेंगरी होण्याची शक्यता होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले, असे परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले.