महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक वाढली, असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्योगमंत्री नारायण राणे करत असले तरी वास्तव तसे नाही. ते जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी पिंपरीत बोलताना केली. ‘छोटय़ा’ पवारांपेक्षा मोठे पवार बरे आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी सहकाराचा संदर्भ देत केली.
पुणे पीपल्स को-ऑप. बँकेच्या चिखली शाखेचे उद्घाटन तावडेंच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योगपती रसिकलाल धारिवाल होते. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष विजयकांत कोठारी, संचालक अॅड. सचिन पटवर्धन, बबनराव भेगडे, अर्जुन पुरस्कारविजेते गोपाळ देवांग आदी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, मद्रास, हैदराबादला गुंतवणूक झाली. त्यांची कार्यालये मुंबईत आहेत म्हणून कागदोपत्री दिसणारी ती गुंतवणूक महाराष्ट्रात झाली म्हणणे चुकीचे आहे. स्वत: ची पाठ थोपटून घेत नागरिकांची दिशाभूल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. बँकिंग क्षेत्राकडे कोणाचेही लक्ष नाही. बुडत असलेल्या बँका पाहूनही अनेकजण त्यात व्यवहार करतात. आयुष्याची कमाई बँकांमध्ये अडकते आणि त्या बँका बुडतात, तेव्हा सर्वसामान्यांची स्वप्नेही बुडतात. संचालकांनी बँकांच्या विश्वस्त म्हणून काम करावे आणि विश्वासार्हता जपावी. देशाची बिघडती आर्थिक स्थिती, रुपयाच्या दरातील घसरण, विकासाला चालना नाही. वाढती सोने खरेदी, निर्यात करणाऱ्या कंपन्यांचे भवितव्य हे चिंतेचे विषय आहेत. सरकारवर विश्वास राहिलेला नाही. त्याचा परिणाम गुंतवणुकीवर होतो आहे. राजकीय पुढारी जनतेची गरज लक्षात न घेता फक्त मागण्यांचा विचार करतात. बँका जनहितासाठी की राजकीय सोयीसाठी, असा मुद्दा त्यांनी या वेळी उपस्थित केला. दुष्काळ व ओला दुष्काळ अशी परिस्थिती महाराष्ट्रात ओढावते, त्याविषयी नियोजन होताना दिसत नाही. नद्याजोड प्रकल्प त्यासाठीच होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
लवकरच सत्तेचा ‘लाल दिवा’
बँकेच्या १९ व्या शाखेच्या उद्घाटनासाठी विरोधी पक्षनेता म्हणून आलो असलो तरी २५ व्या शाखेचे उद्घाटन करण्यासाठी येईल, तेव्हा विरोधी पक्षाचा नव्हेतर सत्तेचा लाल दिवा घेऊन येईल, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा