पुणे : ‘केंद्र शासनाने राज्यातील १२ किल्ल्यांची जागतिक वारसास्थळ म्हणून नोंद व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. युनेस्कोने या किल्ल्यांची वारसास्थळ म्हणून नोंद केल्यास जगभरातील पर्यटक आकर्षित होतील,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे बुधवारी आयोजन करण्यात आले. या पदयात्रेत शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांतील दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘जय शिवाजी जय भारत’ अशा घोषात पदयात्रेचा प्रारंभ शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानातून झाला. या वेळी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, नागरी हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार या वेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्राचे किंबहुना मराठी माणसाचे अस्तित्व छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. त्यांच्यामुळे आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळाली. ते कुशल प्रशासक होते. जलसंधारण, वनसंवर्धन, करप्रणाली, सागरी सुरक्षा, प्रशासन अशा अनेक बाबींचा विचार करून त्यांनी स्वराज्याचा विस्तार केला.’
‘गड-किल्ल्यांना मंदिरांएवढे महत्त्व आहे. राज्य शासनाकडून गड-किल्ल्यांचे जतन करण्याचे काम सुरू आहे. तेथे विविध कामे करण्यात येत आहेत. रायगड आणि शिवनेरी किल्ल्यावर विविध कामे करण्यात येत आहेत. किल्ल्यांच्या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. किल्ल्यांकडे फक्त सामारिकदृष्ट्या बघता कामा नये. वास्तुकला, पर्यावरण, विज्ञान अशा बाबींचा विचार करून किल्ले बांधण्यात आले होते. केंद्र शासनाने राज्यातील १२ किल्ल्यांची जागतिक वारसास्थळ म्हणून नोंद व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. युनेस्कोने या किल्ल्यांची वारसास्थळ म्हणून नोंद केल्यास जगभरातील पर्यटक आकर्षित होतील’, असे फडणवीस यांनी नमूद केले.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाजीनगर येथील श्री शिवाजी प्रिपेटएरी मिलिटरी स्कूलच्या आवारात असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जंगली महाराज रस्तामार्गे पदयात्रा काढण्यात आली. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पदयात्रेचा समारोप करण्यात आला.