भाजपने राज्यात घवघवीत यश मिळवले. ही मोदी लाट नव्हे तर त्सुनामी आहे. विकास आणि विश्वासाच्या जोरावर भाजपला यश मिळाले आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केले. भाजप हा महाराष्ट्र व्यापी पक्ष आहे. भाजपला सत्तेतून सत्ता व शून्यातून सत्ता मिळाली आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेचे सेवक म्हणून कार्य करावे. विजयातून अहंकाराची भावना निर्माण झाल्यास आपलीही अवस्था काँग्रेस, राष्ट्रवादीसारखी होईल, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजपला सत्ता परिवर्तनासाठी नव्हे तर समाज परिवर्तनासाठी काम करायचे आहे, असे ते या वेळी म्हणाले.
पिंपरी चिंचवड येथील राज्य कार्यकारिणीच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी कार्यकर्त्यांना जमिनीवर राहण्याचा सल्ला दिला. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीवरही खरपूस शब्दांत टीका केली. तूर डाळप्रकरणी सरकारवर होत असलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. जलयुक्त शिवारमुळे शेती क्षेत्राची सकारात्मक वाढ झाल्याचे ते म्हणाले.
फडणवीस म्हणाले, भाजपने महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. भाजपने या निवडणुकात सत्तेतून सत्ता व शून्यातून सत्ता प्राप्त केली. नागपूरमध्ये मागील दहा वर्षांपासून भाजप सत्तेवर आहे. या वेळी तिथे ६८ जागांवरून पक्षाने १००च्याही पुढे मजल मारली. तिथे सत्तेतून सत्ता प्राप्त केली. तर लातूर सारख्या ठिकाणी जेथे गत निवडणुकीत आम्ही भरपूर प्रचार केला. पण आमचा तिथे नगरसेवक ही नव्हता. तिथे आम्ही सत्ता मिळवली. कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथील जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ता मिळवली. हे यश म्हणजे आमचे शून्यातून सत्ता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांची संघर्ष तर आमची संवाद यात्रा
गेल्या १५ वर्षांत राज्यातील शेतकऱ्यांची वाईट अवस्था काँग्रेस-राष्ट्रवादीने केली. तेच आज संघर्ष यात्रा काढत आहेत. या अवस्थेला हे संघर्ष यात्रा काढणारेच जबाबदार आहेत. शेतकऱ्यांना माहीत आहे. त्यांना कोणी लुटले. त्यामुळे त्यांच्या यात्रेला कोणी जात नाही, असा टोला त्यांनी लगावला.
त्यांनी एसी बसमधून संघर्ष यात्रा काढली. पण जनतेला संवादाची भूक आहे. त्यामुळे आम्ही त्यांना संवाद यात्रेने उत्तर देऊ. लोकांना सरकारशी संवादाची अपेक्षा आहे. त्यांना संवादाची भूक आहे. आमच्या संवाद यात्रेत मोठ्या सभा नसतील, एसी बस नसेल. आम्ही फक्त जनेतशी संवाद साधून त्यांच्यासाठी आम्ही काय करतोय हे सांगणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.