पिंपरी : चिखली-कुदळवाडी भागातील बेकायदेशीर भंगार दुकानचालक आणि बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली. या भागातील बांगलादेशी रोहिंग्यांच्या मुद्दा उपस्थित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन महापालिका आयुक्त तसेच पोलिस आयुक्तांना त्याबाबत आदेश द्यावेत. तसेच कुदळवाडी, चिखली भागातील कारवाईनंतर होणाऱ्या उद्रेकाबाबतही सतर्क रहावे, असेदेखील म्हटले आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे लांडगे यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. त्या निमित्त आमदार महेश लांडगे यांनी महायुती सरकारचे लक्ष वेधले. आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून आतापर्यंत बेकायदेशीरपणे शहरात वास्तव्य ७० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना मूळ देशात परत पाठवले आहे. बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्ट तयार करुन हे घुसखोर पश्चिम बंगालच्या सीमाभागातून भारतात प्रवेश करतात. रोजगाराच्या निमित्ताने आलेले हे बांगलादेशी देशविघात कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांची संख्या वाढू लागली असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा : पिंपरी : महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची पुन्हा हुलकावणी, शहराच्या ४० वर्षांच्या इतिहासात एकदाही मंत्रिपद नाही

पिंपरी-चिंचवड आणि चाकण, रांजणगाव, तळेगाव आदी एमआयडीसी पट्टयात कमी पगारामध्ये काम करण्यासाठी बांगलादेशी घुसखोर सहज उपलब्ध होतात. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही. दुसरीकडे, घुसखोरांचे ‘कनेक्शन’ देशविघातक कृत्यांमध्ये असल्याचे काही घटनांमध्ये समोर आले आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी शहरातील विविध भागांमध्ये काही दिवसांपूर्वी २३ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. बनावट ओळखीच्या आधारे पासपोर्ट काढून देणारे मोठे रॅकेट काही एजंट चालवतात. पिंपरी-चिंचवड, पुणेसह मोठ्या शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचे रॅकेट सक्रिय आहे, हे स्पष्ट होते. म्हणूनच आता पिंपरी-चिंचवड पोलिस व महापालिका प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. चिखली कुदळवाडी या परिसरामध्ये तातडीने कोंबिंग ऑपरेशन होऊन येथील समाजविघातक कृत्य घडवून आणू शकणाऱ्या व्यक्ती, प्रवृत्तींना वेळीच गजाआड करणे गरजेचे आहे. अशी कारवाई झाल्यानंतर मोठा उद्रेक होण्याची देखील भीती आहे. या दृष्टीने सतर्कतेने पावले उचलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयटीनगरी हिंजवडीसह सात गावांचा समावेश का रखडला?

कुदळवाडी-चिखली भागातील भंगार गोदामे शहरातील नदी, हवा आणि येथील रहिवासी यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहेत. वारंवार येथे आग लागण्याच्या घटना घडतात. मोठ्या प्रमाणात मालमत्तांचे नुकसान होते. पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. या घटनांच्या आडून देशविघात प्रवृत्ती समोर येण्याची भीती आहे. भंगार दुकानांमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या कामगार आहेत. मात्र, त्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे वेळीच बांगलादेशी आणि रोहिंग्यांवर लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. त्यावर उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis assured strict action on bangladeshi rohingya illegally living in pimpri chinchwad bjp mla mahesh landge pune print news ggy 03 css