पुणे : महाराष्ट्र सरकारकडून उद्योगस्नेही धोरणे राबविली जात आहेत. मैत्री संकेस्थळाच्या माध्यमातून उद्योगांसाठी एक खिडकी यंत्रणा सुरू झालेली आहे. यामुळे गुंतवणूकदार आपल्या राज्यात गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दिली. याचबरोबर लहानपणीचे स्वप्न पूर्ण झाल्याची कबुलीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तळेगाव औद्योगिक क्षेत्रात लोट्टे इंडियाच्या हॅवमोर आईसक्रीम उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत सेओंग हो ली, लोट्टे ग्रुपचे अध्यक्ष डाँग बिन शिन, लोट्टे वेलफूडचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल चँग यी आणि हॅवमोर आईसक्रीमचे व्यवस्थापकीय संचालक कोमल आनंद आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, उद्योगांना पूरक वातावरण निर्माण करण्यावर सरकारचा भर आहे. यामुळे त्यांनी अतिशय सहजपणे परवानगी देण्याची प्रक्रिया नवीन मैत्री संकेतस्थळाच्या माध्यमातून होत आहे. कालबद्ध पद्धतीने उद्योगांना परवानगी देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. महाराष्ट्राची धोरणे उद्योगस्नेही असल्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होत आहे. देशातील थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा ३५ टक्के आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे प्राधान्यक्रमाचे ठिकाण बनले आहे.

यावेळी फडणवीस यांनी त्यांचे लहानपणीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचे सांगितले. ते म्हणाले की, लहानपणापासून आईसक्रीमच्या उत्पादन प्रकल्पात एक महिना तरी राहावे, असे माझे स्वप्न होते. अखेर या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मला येथे आलो असून, माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. परंतु, माझा घसा खराब झाल्याने आईसक्रीमचा आस्वाद घेता आला नाही. पुढील वेळी आल्यानंतर मी चार ते पाच प्रकारची आईसक्रीम नक्की खाईन.

एक हजारांहून अधिक रोजगार निर्मिती

लोट्टे इंडियाने हॅवमोर आईसक्रीम प्रकल्प तळेगावमध्ये उभारला आहे. या प्रकल्पात ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून, पुढील २ वर्षांत या प्रकल्पातून १ हजार रोजगार निर्माण होतील. हा प्रकल्प ६० हजार चौरस मीटरवर विस्तारलेला असून, त्याची वार्षिक उत्पादन क्षमता ५ कोटी लिटर आहे. पुढील काही वर्षांत ही उत्पादन क्षमता दुपटीने वाढवून १० कोटी लिटरवरर नेण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis inaugurated havmor ice creams project pune print news stj 05 css