पिंपरी : उद्योजकांना त्रास देणारे कोणत्याही पक्षाचे असले, तरी पोलिसांनी कोणतीही तडजोड न करता त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिला. चिखली येथील पिंपरी-चिंचवड पाेलीस आयुक्तालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन, तसेच पुणे पाेलीस अधीक्षक कार्यालय भूमिपूजन आणि पिंपरी महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

मंगळवारी (४ फेब्रुवारी) रोजी ‘लोकसत्ता वर्षवेध’च्या प्रकाशन समारंभात उद्योगांना त्रास देणाऱ्यांची गय करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकाविले होते. त्याचाच पुनरुच्चार करत फडणवीस म्हणाले, की पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत औद्योगिक क्षेत्र आहे. या परिसरात काही जण त्रास देत असल्याच्या तक्रारी उद्योजकांकडून येत असतात. असे प्रकार आता खपवून घेतले जाणार नाहीत. संबंधितांवर ‘मकोका’अंतर्गत कारवाई करा.

विमानतळासाठी लवकरच भूसंपादन

पुरंदर विमानतळ होणार असून, ते पुण्याच्या विकासाला चौपट पुढे नेईल. लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल तयार करण्यात आले असून पुरंदर विमानतळ होणे आवश्यक आहे. त्याबाबतचा भूसंपादनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे आला असून त्याला तत्काळ मान्यता दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह राज्यमंत्री आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

जगभरातील कंपन्यांशी करार करण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. या गुंतवणुकीला पोषक वातावरण ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीस</strong>, मुख्यमंत्री

Story img Loader