जास्त कार्यक्रम, कमी वेळेच्या अडचणीवर तोडगा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी पालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली, तेव्हापासून येथील विकासकामांचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा स्थानिक नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार, बऱ्याच पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली खरी. मात्र, कार्यक्रमांची संख्या जास्त आणि उपलब्ध वेळ अतिशय कमी असल्याचे स्पष्ट झाले. त्यावर तोडगा म्हणून एकाच ठिकाणी कार्यक्रम घेत तेथूनच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘ऑनलाइन’ पद्धतीने उद्घाटन व भूमिपूजन करण्याचा मार्ग काढण्यात आला आहे. त्यामुळे अतिउत्साही कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.

पिंपरी पालिका जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती, तेव्हा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एकाच दिवशी उद्घाटन व भूमिपूजनांचा सपाटा लावला जात होता. सकाळी नऊपासून ते सायंकाळी उशिरापर्यंत हे सारे कार्यक्रम होत होते आणि त्यासाठी पालिकेची पूर्ण यंत्रणा कामाला लागत होती. संपूर्ण शहर ढवळून निघत होते, वातावरणनिर्मिती होत होती. त्याचा राजकीय फायदा राष्ट्रवादीला मिळत होता. सत्तांतर झाले व भाजपच्या हातात कारभाराची सूत्रे आली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोठय़ा कामांची सुरुवात करण्याचे धोरण स्थानिक नेत्यांनी ठरवले. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांची वेळ मिळावी म्हणून सातत्याने प्रयत्न केला, मात्र ते जुळून येत नव्हते. बराच पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तीन तासांचा अवधी दिला. त्यानुसार, कार्यक्रमांचे नियोजन सुरू झाले. प्रत्येकाला आपापल्या भागात मुख्यमंत्र्यांना आणायचे होते. त्यामुळे कोणाचे कार्यक्रम समाविष्ट करायचे, यावरून चढाओढ सुरू झाली. मात्र, अतिशय व्यग्र असल्याने मुख्यमंत्र्यांनी तीन तासांऐवजी दीड तासात सर्व कार्यक्रम उरकण्याची सूचना केली, किंवा हे कार्यक्रम लांबणीवर टाकण्याचा पर्याय दिला. तेव्हा दीड तासाचा पर्याय निवडण्यात आला. अखेर, भोसरी नाटय़गृहात शनिवारी साडेतीन ते पाच या वेळेत एकत्र सर्व कार्यक्रम घेण्याचे ठरले. पाचही कार्यक्रमांचा ऑनलाइन पद्धतीने प्रारंभ करण्यात येणार आहे. नाटय़गृहातच असलेल्या अन्य सभागृहांत कार्यकर्ते व नगरसेवकांची बैठक होणार असून, मुख्यमंत्री त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम

  • भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन
  • वडमुखवाडी येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन
  • निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह चौकातील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर कामाचे भूमिपूजन
  • जगताप डेअरी चौकातील उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरच्या कामाचे भूमिपूजन
  • पिंपळे गुरव येथील निळूभाऊ फुले नाटय़गृहाचे उद्घाटन
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis pimpri chinchwad tour