महाबळेश्वरमधील भिलार येथे ‘पुस्तकांचा गाव’ या देशातील पहिल्या अभिनव संकल्पनेचे उद्घाटन होत असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करीत नसल्याचा ठपका ठेवून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा शाखेतर्फे मुख्यमंत्र्यांसमोर काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात येणार आहे. भाषेच्या अभिजात दर्जाचा निर्णय ज्यांच्या हाती आहे त्यांच्यासमोर निदर्शने करावयाची सोडून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करीत आंदोलन करण्याची घोषणा म्हणजे परिषदेची अजब तऱ्हा असल्याची चर्चा साहित्य वर्तुळात होत आहे.

ब्रिटनमधील ‘हे ऑन वे’ या पुस्तकांच्या गावाच्या धर्तीवर भिलार (जि. सातारा) येथे निर्माण करण्यात आलेल्या देशातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचे गुरुवारी (४ मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या गावातील २५ घरांमध्ये तब्बल १५ हजार पुस्तकांचा खजिना वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्य़ातील केशवसुत यांचे मालगुंड हेदेखील पुस्तकांचे गाव म्हणून विकसित करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे गुरुवारी उद्घाटन होत असताना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याची घोषणा करीत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा शाखेने पाहुण्यांचे स्वागत करण्याची तयारी केली आहे. एकीकडे सरकार काही करत नाही अशी टीका केली जाते. आता सरकारने ठोस प्रकल्प राबविला असताना त्याच्या उद्घाटनप्रसंगी अशी कृती करून परिषद आपलेच हसू करून घेत आहे, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा निर्णय हा केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे याची आंदोलनकर्त्यां परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना पूर्ण कल्पना आहे. असे असतानाही राज्य सरकार कोणतेही प्रयत्न करीत नाही, असा ठपका ठेवून मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करण्यातून काय साध्य होणार आहे याचे उत्तर मिळत नाही. मराठी भाषा अभिजात दर्जा मिळण्यासाठी सर्व निकषांमध्ये पात्र ठरत असली तरी सध्या याबाबतचा निर्णय न्यायप्रविष्ट असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करण्याचे फलित काय हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. वास्तविक परिषदेचे पदाधिकारी भाषेच्या अभिजात दर्जासाठी महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर मुख्यमंत्र्यांच्या वर्षां बंगल्यावर सोमवारी (१ मे) निदर्शने करणार होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन करता येणार नाही, असे शाहुपुरी पोलीस ठाण्याने कळविले. आता पुस्तकाच्या गावाचे उद्घाटन होत असताना ४ मे हा आंदोलनाचा दिवस निवडण्यात आला आहे.

पुण्यातील साहित्यिकांची आज ‘पुस्तकांच्या गावा’ला भेट

महाराष्ट्र साहित्य परिषदेने आंदोलनाचे हत्यार उपसले असताना संवाद पुणे संस्थेने पुण्यातील मान्यवर साहित्यिकांना ‘पुस्तकांचा गाव’ दाखवून आणण्याची सहल रविवारी (३० एप्रिल) आयोजित केली आहे. संवाद पुणे संस्थेचे अध्यक्ष सुनील महाजन हे परिषदेचे माजी कोशाध्यक्ष असल्याने अशा पद्धतीची सहल आयोजित करून परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर मात केल्याची चर्चा साहित्य वर्तुळामध्ये आहे. लेखक, कवी, बालसाहित्य संमेलनाचे आजी-माजी अध्यक्ष, व्यंगचित्रकार, प्रकाशक, वाङ्मय क्षेत्रातील कार्यकर्ते अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा त्यामध्ये समावेश आहे. साहित्याच्या प्रसारासाठी सरकार चांगले काम करीत असताना आपण त्याचे स्वागत केले पाहिजे या भूमिकेतून हे पाऊल उचलले असल्याचे सुनील महाजन यांनी सांगितले.

Story img Loader