पिंपरीः दळणवळणाची यंत्रणा सक्षम असणाऱ्या राज्यांची प्रगती जास्त वेगाने होत असल्याचे सांगत पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याचे कसोसीने प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पिंपरी-चिंचवडला बोलताना सांगितले.
पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडींची तीव्र समस्या आपल्या निदशर्नास आणून दिल्यानंतर त्या ठिकाणी योग्य ती कार्यवाही सुरू केली, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यापीठ चौक, कात्रज रस्ता अशा पुण्यातील विविध भागातील वाहतूक कोंडीचे दाखले दिले.
दळणवळण यंत्रणा सक्षम करण्याकडे सरकारचा कल आहे. त्यामुळेच समृद्धी महामार्ग, मिसिंग लिंक, पुण्यातील रिंग रोड या प्रकल्पाची कामे वेगाने सुरू आहेत. मेट्रोलाही चालना दिली आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाल्यानंतर रस्त्यांवरील लाखो वाहने कमी होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.