पिंपरी-चिंचवड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (४ ऑक्टोबर) दुपारी मावळ दौऱ्यावर येणार असून कार्ला गड येथील एकवीरा आईचे दर्शन घेणार आहेत. गडावरील पायऱ्यांची दुरूस्ती, संरक्षण भिंत, मुख्य मंदिराची दुरूस्ती, विश्रांती कक्ष अशा ३९.४३ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला वेहेरगाव येथील कुलस्वामिनी आई एकविरा देवीच्या मंदिरात गुरुवारी घटस्थापना झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त कार्ला गडावर एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येत असतात. गडावर येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्याबाबत खासदार बारणे यांनी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्ला गडाचा कायापालट करण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातून (एमएमआरडीए) ३९.४३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कंत्राटदाराला वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे. या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचा : प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक, नेमकं काय कारण? वाचा सविस्तर…

मंदिर, नगारखाना, स्तंभ व समाधीच्या जीर्णोद्धारासह मंदिर परिसरातील कामे केली जाणार आहेत. मुख्य मंदिर, नगारखान्याची दुरुस्ती, स्तंभ व समाधीच्या दगडी बांधकामाची सफाई आणि सांधे भरणी, सद्यस्थितीतील रांग मंडप उतरवून नवीन रांग मंडप उभारणे, मोकळ्याजागेत बगीचा निर्माण करणे, तिकीटघर व शौचालय बांधणे, डोंगराच्या कठड्याला लागून दगडी पादचारी रस्ता तयार करणे, पायऱ्यांची दुरूस्ती, संरक्षण भिंत, शौचालय, पार्किंगचे बांधकाम, धबधब्या जवळ तटबंधी दुरुस्ती करून विश्रांती क्षेत्र तयार करणे, पायऱ्यांच्या मध्यंतरी दमलेल्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, बाकडे आणि कचरापेट्या बसवणे, भाविक व पर्यटकांच्या माहिती व सुरक्षिततेसाठी सूचना फलके बसविण्याच्या कामाचा शुभारंभ होणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

Story img Loader