पुणे दौऱ्यावर असताना काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जाऊन डॉ. प्रकाश आमटे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. डॉ. आमटे हे सध्या रक्ताच्या कर्करोगाने आजारी असून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुढील उपचार घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांना समजले. पुणे दौरा आटोपून रात्री त्यांनी डॉ.आमटे याना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
प्रकृती साथ देत नसली असली तरीही या आजाराला सकारात्मकरित्या तोंड देण्याची त्यांची जिद्द आणि या परिस्थितीत देखील आयुष्य समृद्धपणे जगण्याची इच्छा त्यांच्या देहबोलीतून जाणवली. या भेटीनंतर त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे आणि पुत्र डॉ. कौस्तुभ आमटे आणि इतर कुटूंबियांशी बोलून त्यांनी त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर देखील उपस्थित होते.
यासोबतच भाजपाचे नेते पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी देखील याच रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल आहेत. त्यांची देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी आमदार उदय सामंत, माजी आमदार विजय शिवतारे आणि आमटे कुटूंबीय उपस्थित होते.