दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह नेमकं कुणाचं? यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच दावोसमध्ये शिंदे सरकारने केलेल्या करारांवर विरोधकांकडून आक्षेप घेतले जात असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे ही दिग्गज नेतेमंडळी काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी शरद पवारांच्या समोरच दावोस करारांवरून विरोधकांना टोला लागावला आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण समारंभाला या सर्व नेतेमंडळींनी आज हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साखर उत्पादक शेतकरी आणि कारखान्यांच्या उत्पादकतेचं कौतुक केलं. मात्र, राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते व्यासपीठावर असतानाही विरोधकांना टोला लगावण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी साधली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दावोसमध्ये झालेल्या करारांवर विरोधकांनी घेतलेल्या आक्षेपांचा समाचार घेतला. “मागच्याच आठवड्यात मकर संक्रांत झालीये. सगळ्यांनीच गोड बोलायचंय. मीही नुकताच दावोसला जाऊन आलो. शरद पवार अनुभवी आहेत, त्यांना माहिती आहे. कुणी काहीही म्हटलं, तरी आपल्या राज्यासाठी मोठ्या गुंतवणुकीचे करार तिथे झालेत. हे सगळे उद्योग आपल्या राज्याच्या विविध भागांमध्ये येणार आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं सहकार्य नक्कीच अपेक्षित आहे”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
दावोस परिषदेतील गुंतवणुकीवरून वाद : राज्यातील कंपन्यांशीच करार केल्याचा विरोधकांचा आरोप
दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने ज्या कंपन्यांशी सामंजस्य करार केले, त्यापैकी काही कंपन्या महाराष्ट्रातच नोंदणीकृत असल्याचे उघड झाल्यानंतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
शरद पवार मला फोन करतात – एकनाथ शिंदे
“शरद पवार सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. ते अनुभवी नेते आहेत. त्यांनी आजपर्यंत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यामुळेच कुठला माणूस सत्तेवर बसलाय, हे न पाहाता या राज्याच्या हितासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करतात. मलाही ते आवश्यकता असेल तेव्हा फोन करतात, सूचना करतात, मार्गदर्शनही करतात. मी त्यांचा मनापासून आभारी आहे”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
“एखादा माणूस, संस्था जेव्हा चांगलं काम करतात, त्यामुळे अनेक लोकांना फायदा होतो, अशा लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यावर ते आणखीन चांगलं काम करू लागतात. इतरही त्यांची प्रेरणा घेतात आणि आणखी लोक चांगलं काम करू लागतात. प्रत्येकात स्पर्धा निर्माण होते की आपणही चांगलं काम केलं पाहिजे. त्यामुळे समाजात चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते आणि त्याचा समाजाला फायदा होतो”, असंही एकनाथ शिंदेंनी यावेळी नमूद केलं.