युती म्हणून आम्ही मते मागितली, सर्वसामान्य लोकांनी युती म्हणून मतदान केले होते. पण, निकाल आल्यानंतर काही लोकांनी सर्व दरवाजे उघडे आहेत म्हणत काँग्रेसला डोक्यावर घेतले. शिवसेना, धनुष्यबाण, शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी निर्णय घेतला. गहाण ठेवलेला धनुष्यबाण वाचविला. आम्ही धाडस केले नसते तर शिवसेना दिसली नसती. असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. निर्णयानंतर पुढे काय आणि कसे होणार याची अनेकांना चिंता होती. आता सर्वजण निर्णय योग्य असल्याचे सांगत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसंकल्प अभियान सभा किवळे येथील मुकाई चौकात घेण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार विजय शिवतारे, इरफान सय्यद यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>> पुण्यातील नाट्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “दीड वर्षापूर्वीच्या राजकीय धाडसाच्या कथानकावर…”
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, युती म्हणून आम्ही मते मागितली, सर्वसामान्य लोकांनी युती म्हणून मतदान केले होते. पण, निकाल आल्यानंतर काही लोकांनी सर्व दरवाजे उघडे आहेत म्हणत काँग्रेसला डोक्यावर घेतले. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपला विश्वास फोल ठरला. शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले, अन्याय होऊ लागला. संघटना कमकुवत होत होती. आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो. शिवसेना, धनुष्यबाण, शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी निर्णय घेतला. गहाण ठेवलेला धनुष्यबाण वाचविला. आम्ही धाडस केले नसते तर शिवसेना दिसली नसती.
संघर्ष करणे, अन्यायाविरोधात लढण्यास बाळासाहेब ठाकरे यांनी शिकविले. धाडस सोपे नव्हते. पण, अन्यायाविरोधात पेठून उठून दीड वर्षापूर्वी निर्णय घेतला. सत्ता सोडून आम्ही गेलो. पन्नास आमदार, तेरा खासदार माझ्यासोबत आले. त्यावेळी काय, कसे होणार याची अनेकांना चिंता होती. आता सर्वजण निर्णय योग्य असल्याचे सांगत आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही वाचा >>> “आता आमचा नाट्य क्षेत्रात हस्तक्षेप वाढणार”; उद्योगमंत्री उदय सामंत असे का म्हणाले?
शहरातील शास्तिकराचे ६५० कोटी माफ केल्यानंतर अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
शिवसैनिकांला मुख्यमंत्री बनवतो म्हणून स्वतःच मुख्यमंत्री झाले. खुर्चीवर बसले. मला मुख्यमंत्री केले नाही, याचे दुःख नाही. परंतु, मुख्यमंत्री बनून काय कमविले याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. आरोप करून भागणार आहे का याचा विचार करावा. मी बाळासाहेब, शिवसेनेच्या भूमिकेबाबत तडजोड करणार नाही. त्यामुळे लोक माझ्यासोबत येत आहेत. खरी शिवसेना आपली आहे कारण धनुष्यबाण आपल्याकडे आहे.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ एवढ्या पुरते माझे काम नाही. संपूर्ण महाराष्ट्र माझा परिवार आहे. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगविला.
‘दहा जनपथला मुजरा करण्यासाठी दिल्लीला जात नाही’
अडीच वर्षे अहंकारापोटी राज्याला मागे नेले होते. डबल इंजिन सरकार गतिमान पद्धतीने काम करत आहे. आम्ही राज्यात निधी, प्रकल्प आणण्यासाठी दिल्लीला जातो. दिल्लीला दहा जनपथला मुजरा करण्यासाठी जात नाही, असे उत्तर विरोधकांच्या दिल्लीला जाण्याचा आरोपांना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. राज्य सरकारला केंद्राचे पाठबळ मिळते. पाठविलेले प्रस्ताव तत्काळ मान्य होतात, एक रुपयाही कमी होत नाही, असेही ते म्हणाले.
खासदार बारणे म्हणाले की, शहरातील शास्ती कराचा प्रश्न सोडवून सर्वसामान्य लोकांना दिलासा दिला. शहरातील विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न प्रलंबित असून तो सोडविण्यात यावा. इंद्रायणी, पवना नदी स्वच्छ करण्याचा संकल्प केला. या कामाला गती मिळावी. पुणे ते लोणावळा रेल्वेचा तिसरा आणि चौथा मार्ग पूर्ण करण्यासाठी शासनाने सहकार्य करावे’