पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली असून, भाजपाकडून हेमंत रासने, तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांच्यात निवडणूक होत आहे. या निवडणुकीत हेमंत रासने यांना मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर २४ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुपारी तीनच्या सुमारास कसबा विधानसभा मतदारसंघात रॅली होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या निवडणुकीत हेमंत रासने प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वासदेखील म्हस्के यांनी व्यक्त केला.
नरेश म्हस्के म्हणाले की, “कसबा पोटनिवडणुकीत भाजपा आणि शिवसेना निवडणुकीला सामोर जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी विविध समाजातील नागरिकांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये नागरिकांनी अनेक व्यथा मांडल्या. त्या सोडविण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल आहे. आजपर्यंत विविध समाजाची बैठक कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. ती बैठक घेण्याच काम एकनाथ शिंदे यांनी केल्याने नागरिक समाधानी आहे”, असे सांगत म्हस्के यांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
पुण्यात महाविकास आघाडीत लवकरच राजकीय भूकंप होणार
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या सततच्या विधानामुळे अनेक नगरसेवक, आमदार आणि खासदार आमच्याकडे काम करत आहेत. आता त्यांच्याकडे राहिलेले उर्वरित आमदार आणि खासदार हे देखील लवकरच येतील. त्या सर्वांना किंवा आजवर आमच्याकडे आलेल्या नेत्यांना कोणत्याही पद्धतीचे आमिष दाखविले नाही. तसेच आता कसबा पोटनिवडणुकीनंतर पुण्यातील ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणावर राजकीय भूकंप होणार आहे, अशी भूमिका म्हस्के यांनी मांडली.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे रोज सकाळी उठून जी बडबड करतात. त्यातून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्या आरोपामध्ये काही तथ्य नसून एक दिवस ठाकरे गटातील शिल्लक नेते मारतील. त्यामुळे संजय राऊत यांनी त्या प्रकारचे विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केल्यावरच त्यांना प्रसिद्धी मिळणार आहे. संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर पुरावे द्यावे, अशी मागणी म्हस्के यांनी केली.