शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांची पुण्यातील कात्रज चौकात मंगळवारी सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा आटोपल्यानंतर शिवसेनेचे काही कार्यकर्ते तेथून जात होते. दरम्यान, त्यांना शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांची चारचाकी गाडी दिसली. यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तर काही कार्यकर्त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारताच ते म्हणाले की, असा भ्याड हल्ला करून, दगड मारून पळून जाणं म्हणजे काही मर्दुमकी नाही. त्यामुळे प्रत्येकाने कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे. ती जबाबदारी आपल्या सर्वांची असून सर्व नियमांचे पालन झाले पाहिजे. कायदा सुव्यवस्था कोणी बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर, त्यावर पोलीस कारवाई करतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा- पुण्यातील हल्ल्यानंतर उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “शिवसैनिकांनी…”
तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यात सर्वांनी जातीय, सामाजिक सलोखा राखला पाहिजे. शांतता राखली पाहिजे. यामध्ये कोणीही आततायीपणा करत असेल तर पोलीस त्यावर कारवाई करतील. शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानं गाड्या फोडण्याची चिथावणीखोर भाषा केली होती. त्यानंतर ही घटना घडली आहे. त्यावर ते म्हणाले की, जे कोणी चिथावणीखोर भाषा करतील, त्याची तपासणी पोलीस करतील आणि अशावर निश्चित कारवाई होईल, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.