पिंपरी : शंभरावे संमेलन दोन वर्षांपूर्वी होणे अपेक्षित होते. परंतु, करोनामुळे झाले नाही. कदाचित नियतीच्या मनात असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरच शंभरावे संमेलन व्हावे. आणि १०० व्या संमेलनाला मला मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहता आले, अशी फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐतिहासिक शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची चिंचवड येथील श्री मोरया गोसावी संकुल येथे घंटा वाजली. ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या उपस्थितीत नटराज, घंटेचे पूजन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, शंभराव्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित आहेत

संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले, “दिमाखदार सोहळा आयोजित केला आहे. कलेच्या क्षेत्रात एखादा उपक्रम दरवर्षी १०० वर्षे करत राहणे हे सोपे काम नाही. हे केवळ मराठी माणसाच्या रंगणभूमीवरील प्रेमामुळे शक्य झाले. मराठी प्रेक्षक दर्दी आणि चोकंदळ आहे. खरे तर हे शंभरावे संमेलन दोन वर्षांपूर्वी होणे अपेक्षित होते. परंतु, करोनामुळे झाले नाही.”

हेही वाचा : “आम्ही केवळ तीन तास अभिनय करतो, तर राजकीय लोक…”; प्रशांत दामले यांची फटकेबाजी

“कदाचित नियतीच्या मनात असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरच शंभरावे संमेलन व्हावे. आणि १०० व्या संमेलनाला मला मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहता आले. राजकारणात देखील काही धाडसी प्रयोग होतात. आम्ही दीड वर्षांपूर्वी असाच प्रयोग केला आहे. त्याची इतिहास नोंद होईल. अभिनेते अभिनय करतात. मनावर उपचार करणारे औषध म्हणजे नाटक आहे. नाटकाचे तिकीट काढणे म्हणजे कलावंताचे कौतुक करणे आहे. आम्ही नेते असलो तरी तुम्ही अभिनेते आहात. प्रेक्षकांसमोर तुम्हाला अभिनय करावा लागतो,” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde speech in 100 marathi natya sammelan pune print news ggy 03 pbs