पुणे : माझा पक्ष आणि महायुती शिरूरच्या तिकीटाबद्दल ठरवतील. तिकीट वाटप ठरवताना विजयी उमेदवारानंतर दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवाराचा आधी विचार केला जातो. २०१९ मध्ये शिरूरमधून दुसऱ्या क्रमांकाची मते शिवसेनेला मिळालेली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिरूरची जागा शिवसेनेलाच मिळण्यासाठी मागणी करतील. त्यानंतरही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ही जागा राष्ट्रवादी किंवा भाजपला द्यायचे ठरविल्यास त्यानुसार नियोजन होईल, याला माझी हरकत नसेल, अशी भूमिका माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी गुरुवारी जाहीर केली. मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी जो उमेदवार असेल, त्याचे काम करण्याचे ठरविले आहे. मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शब्दाबाहेर नाही, असेही आढळराव यांनी सांगितले.
हेही वाचा >>> तुम्ही खात असलेला पदार्थ खरोखरच शाकाहारी आहे का ? केंद्र सरकार करणार कायद्यात सुधारणा
म्हाडा पुणे मंडळाचे सभापती म्हणून गुरुवारी पदभार स्वीकारला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, म्हाडा पुणे मंडळाचे मुख्याधिकारी अशोक पाटील या वेळी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आढळराव म्हणाले, ‘शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार नसल्यानेच म्हाडा पुणे मंडळाचा सभापती करण्यात आल्याच्या चर्चेत तथ्य नाही. हा विषय गेल्या दीड वर्षांपासून सुरू होता. चार-पाच महिन्यांपूर्वी मुख्य सचिवांशी चर्चा झाल्यानंतर मंत्रालयातून जिल्हास्तरावर सर्व प्रक्रिया करण्यात वेळ गेला. मला खात्री आहे, महायुतीत ही जागा शिवसेनेला मिळेल आणि तेथून मीच उमेदवार असेन. मुख्यमंत्री शिंदे यांनी मला काम चालू ठेवा, थांबवू नका असे सांगितले आहे. माझा पक्ष जे ठरवेल ते मला मान्य असेल.’