पुणे : पोलीस खात्यावर आरोप करत पोलिसांच्या कारभारावर टीका करणारे शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे, गायकवाड यांना कडक समज द्या. त्यानंतरही वारंवार ते असेच बोलत असतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल,’ असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
बुलडाण्याचे शिवसेनचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी शुक्रवारी महाराष्ट्र पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. ‘पोलिसांनी जर ५० लाख पकडले, तर ५० हजार दाखवितात. सरकारने नवीन कायदा बनविला, तर पोलिसांना एक हप्ता वाढून जातो. गुटखाबंदी केली, की पोलिसांचा एक हप्ता वाढतो. दारूबंदी केली, की पोलिसांचा एक हप्ता वाढतो’ अशा शब्दांत आमदार गायकवाड यांनी पोलीस खात्याच्या कारभारावर टीका करत ‘घरचा आहेर’ दिला होता.
याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी बोलणार आहे. आमदार गायकवाड यांना कडक समज देण्यास सांगणार आहे. वारंवार असे चालणार नाही. हे योग्य नाही. मात्र, त्यानंतरही ते बोलतच असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.’