पुणे : ‘एकही पाकिस्तानी नागरिक राज्यात राहणार नाही. तसेच, एकही पाकिस्तानी नागरिक गायब किंवा हरविलेला नाही. त्याबाबत माध्यमांनी उलट-सुलट बातम्या देऊ नये. सोमवारी सायंकाळपर्यंत सर्व पाकिस्तानी नागरिक परत पाठविले जातील,’ असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले.काश्मीर येथील पहलगाम येथे गेल्या आठवड्यात दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे.

राज्यात पाच हजारांहून अधिक पाकिस्तानी नागरिक असून, त्यापैकी शंभराहून अधिक नागरिक सापडत नसल्याची चर्चा आहे. यासंदर्भात पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना फडणवीस यांनी त्याबाबतचे स्पष्टीकरण दिले.दरम्यान, ‘अनधिकृत फ्लेक्स उभारणीवर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे. फ्लेक्स लावायचा असेल, तर अधिकृत होर्डिंग्वर जाहिरात केली पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृत फ्लेक्स लावले असतील, तर त्यावर कारवाई करावी, अशी सूचना मी राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना केली आहे. शहर विद्रुप होऊ नये, यासाठी कडक कायदे करावे लागतील,’ असे फडणवीस म्हणाले.

कोणीही पाकिस्तानी नागिरक बेपत्ता, गायब किंवा हरविलेला नाही. रविवारी किंवा सोमवारी सायंकाळपर्यंत सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविले जाईल.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री