पुणे : ‘व्हिसा घेऊन महाराष्ट्रात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची संपूर्ण माहिती राज्य सरकारकडे असून, त्यांना परत पाठविण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. माणुसकीच्या दृष्टीने उपचारांसाठी भारतात राहू देण्याची विनंती काही पाकिस्तानी रुग्णांनी केली असली, तरी हा अधिकार केंद्र सरकारचा आहे. देशाच्या सुरक्षिततेचा आणि अस्मितेचा प्रश्न निर्माण होतो, त्या वेळी कडक निर्णय घ्यावेच लागतात,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले.

यशदा येथे ग्रामविकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेसाठी मुख्यमंत्री फडणवीस आले होते. त्या वेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.फडणवीस म्हणाले, ‘पाकिस्तानमधील जे नागरिक राज्यात व्हिसा घेऊन राहत आहेत. त्यांची संपूर्ण यादी राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. त्यांना देश सोडण्याबाबतची नोटीस बजाविली जात असून, पोलिसांना त्याबाबतच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.‘मानवतेच्या दृष्टीने विचार करून रुग्णांवर उपचार होईपर्यंत भारतात राहू देण्याची मागणी केली जात असली, तरी याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नव्हे, तर केंद्राला आहे. भावनेपेक्षा देशाची सुरक्षितता आणि अस्मितेचा प्रश्न महत्त्वाचा आहे,’ असे फडणवीस म्हणाले.

सिंधू करार मोडल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, भारतावर बॉम्ब टाकू अशी धमकी पाकिस्तानकडून दिली जात असल्याबाबत फडणवीस म्हणाले, ‘त्यांच्याकडे खायला पैसे नाहीत. भारताने सिंधू करार मोडल्यानंतर पाकिस्तानवर पाण्याविना मरण्याची वेळ येईल. हा करार एका दिवसात मोडला जाणार नाही. करार मोडल्यानंतर जमा होणारे पाणी कुठे साठवायचे याचे तीन ते चार पर्याय भारताकडे आहेत.’

‘…तर शंभर वर्षे मुख्यमंत्री’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस हेच २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहतील, असे वक्तव्य केले आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘बावनकुळे यांच्या हातात असेल, तर ते मला पुढील १०० वर्षे मुख्यमंत्री म्हणून ठेवतील. त्यांच्या या शुभेच्छा आहेत. त्याचा मथितार्थ समजून घ्यावा. त्यांनी माझ्या चांगल्यासाठीच या शुभेच्छा दिल्या आहेत. कोणीही दीर्घकाळ कोणत्याही पदावर राहत नाही. त्यामुळे माझी भूमिका बदलायची तेव्हा बदलेल.’