पुणे : ‘विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीपूर्वीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शरद पवार यांच्याबरोबर जायचे ठरले होते. या निवडणुकीत भाजपचे १२० आमदार निवडून आले असते, तर ठाकरे आम्हाला कधीच सोडून गेले नसते. जेव्हा आपण सरकार बनवू शकतो, हे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा उद्धव ठाकरेंनी रंग बदलला,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले.

‘जयपूर डायलॉग’च्या डेक्कन समिट कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. ‘शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यात येणार नाही, असे उद्धव ठाकरे यांना स्पष्टपणे सांगितले होते. भाजपचे नेते अमित शहा मुंबईत आले, तेव्हा शहा यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती,’ असे नमूद करून ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे अमित शहांना आत भेटायला गेले. त्या वेळी आदित्य, वहिनी (रश्मी ठाकरे) आणि मी बाहेर बसलो होतो. ते बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषद घ्यायचे ठरले. त्यात काय बोलायचे ते ठरले. जसे ठरले होते तसे मी बोललो.

मराठी तसेच हिंदीमध्ये मी बोललो. आत मुख्यमंत्रिपदाबाबत काही बोलणे झाले असते, तर ते बाहेर आल्यानंतर माझ्याशी तसे बोलले असते. पण तसे झाले नाही. निकाल आल्यानंतर ठाकरे यांनी आमच्याबरोबर पत्रकार परिषद घेण्याऐवजी अगोदरच पत्रकार परिषद घेतली. ‘आम्हाला सगळे पर्याय खुले आहेत,’ असे सांगितले. जर मुख्यमंत्रिपदाबाबत काही ठरले असेल, तर त्याची किमान चर्चा केली असती. त्यांनी माझा फोनदेखील घेतला नाही. आपण सरकार बनवू शकतो, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी रंग बदलला. शरद पवार यांच्याबरोबर त्यांचे निवडणुकीपूर्वीच ठरले होते.’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील मतदारांच्या संख्यावाढीबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी आपल्या पराभवाच्या कारणांचा शोध घेतला, तरच त्यांचा पक्ष टिकून राहील. मात्र, ते पराभवासाठी उगाच वेगवेगळी कारणे देत राहिले, तर आगामी काळात काँग्रेसची अवस्था अधिक बिकट होईल. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांमध्ये एक कोटी मतांचा फरक आहे. राहुल गांधी हे सतत भ्रमात राहणारे नेते आहेत. जनतेने त्यांची साथ सोडली आहे याची जाणीवही त्यांना होत नाही.’

‘राहुल यांच्या विधानांमुळे अराजकतावादी संघटनांना बळ’ ‘देशातील घटनात्मक यंत्रणांबाबत अपप्रचार करून त्यांच्याबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा १८० अराजकतावादी संघटनांचा कट आहे. राहुल गांधी यांच्या भ्रामक विधानांमुळे त्यांना बळ मिळते आहे,’ असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याचप्रमाणे, ‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासारख्यांना बरोबर घेऊन त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या तर त्यांचे विचारही तसेच राहणार आहेत,’ असा टोलाही हाणला.

Story img Loader