पुणे : ‘काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबाने नक्की काय घडले, याच्या व्यथा मांडल्या आहेत. त्यांनी जे अनुभवले आणि बघितले ते मांडले आहे. ज्यांना ते मान्य करायचे असेल, ते मान्य करतील, ज्यांना डोळे उघडे ठेवूनही झोपेचे सोंग घ्यायचे असेल, ते झोपेचे सोंग घेतील,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी म्हणाले.
पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या मारल्याचे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी, ‘काही जण म्हणतात धर्म विचारून गोळी मारली, तर काही जण म्हणतात धर्म विचारला नाही,’ असे वक्तव्य केले होते, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी, ‘धर्म विचारून गोळ्या मारल्या यामध्ये काय सत्य आहे, याबाबत मला माहिती नाही,’ असे म्हटले होते. त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी वरील विधान केले.
दरम्यान, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण खंबीर राहिलात, त्याचप्रमाणेच यापुढेही खंबीर राहावे, राज्य शासन आपल्या पाठीशी आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना धीर दिला. संतोष जगदाळे यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची पत्नी प्रगती जगदाळे, मुलगी आसावरी जगदाळे, तसेच कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून धीर दिला. या वेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, सुनील कांबळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कौस्तुभ गनबोटे यांची पत्नी संगीता गनबोटे, मुलगा तुषार, कुणाल, स्नुषा कोमल गनबोटे उपस्थित होते.