शिवसेनेच्या वाटेवर असलेले काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांना चिंचवड मतदारसंघाची संभाव्य लढत सोयीची व्हावी, यासाठी त्यांचे समर्थक व विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी चिंचवड मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मतदारसंघ वाटपाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी स्पष्ट केले असताना, नढे यांनी स्वतंत्रपणे चिंचवडसाठी आग्रह धरल्याने काँग्रेसमध्ये तसेच दोन्ही काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगणार आहे.
नगरसेवकांचे गटनेते असलेले नढे भाऊसाहेबांचे समर्थक आहेत. भोईर शिवसेनेचे तिकीट मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नात असताना त्यांच्यासाठी खिंड लढवण्याचे काम नढे यांनी हाती घेतले आहे. भोइरांना सेनेची उमेदवारी मिळालीच तर प्रतिस्पर्धी म्हणून तगडय़ा राष्ट्रवादीपेक्षा तुलनेने सोपा असलेला काँग्रेसचा उमेदवार मिळावा, असा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. लोकसभेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चिंचवडमधून अगदीच नगण्य मते मिळाली होती. त्या तुलनेत काँग्रेसला गेल्या विधानसभेत जास्त मते होती. याशिवाय, काँग्रेसला मानणारा वर्ग जास्त असल्याने राष्ट्रवादीपेक्षा चिंचवड काँग्रेसला सोडावा, असा युक्तिवाद नढे यांनी माणिकरावांकडे केला आहे. चिंचवडसाठी काँग्रेसकडे उमेदवारांची रांग आहे, असे सांगत सचिन साठे, बाबासाहेब तापकीर, ज्योती भारती, आरती चोंधे इच्छुक असल्याची यादी देत वेळप्रसंगी आपणही तयार असल्याचे नढे यांनी सांगितले. भाऊसाहेब इच्छुक नाहीत, त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही मागणी भाऊसाहेबांसाठी केली नसल्याचा दावा नढे यांनी केला आहे.
 
राजीनाम्याच्या इशाऱ्याकडे मुख्यमंत्र्यांचा कानाडोळा
पिंपरीतील महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मार्गी लावावेत, अन्यथा आम्ही पक्षाचे राजीनामे देऊ, अशा इशारा विनोद नढे यांच्यासह काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी दिला होता. त्याकडे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. माणिकरांना सांगितले तर ते ‘पाहू’ म्हणाले. आता निदान चिंचवडची मागणी तरी मान्य करावी, असे नढे म्हणाले. लोकसभेची उमेदवारी नाकारणारे लक्ष्मण जगताप राष्ट्रवादीकडून चिंचवडची उमेदवारी स्वीकारतील, असे वाटत नसल्याची टिपणीही त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm ignores warning of pimpri congress corporators