पुणे : पुणे आणि पिपरीं-चिचवडसह आजूबाजूच्या परिसरात सीएनजीच्या दरात रविवारी मध्यरात्रीपासून वाढ करण्यात आली आहे. यामुळे सीएनजी दर आता प्रतिकिलो ८५.९० रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, पाईप्ड नॅचरल गॅसच्या (पीएनजी) दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) पुणे, पिंपरी-चिचवडसह चाकण, तळेगाव हिंजवडमध्ये सीएनजीचा पुरवठा केला जातो. कंपनीने रविवारी मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रतिकिलो ९० पैसे वाढ केली आहे. यामुळे सीएनजीचा दर प्रतिकिलो ८५.९० रुपयांवर गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचा दर वाढल्याने त्याची आयात महागली आहे. यामुळे कंपनीने सीएनजीच्या दरात वाढ करण्याचे पाऊल उचलले आहे.
कंपनीने म्हटले आहे की, सीएनजीची मागणी वाढत असून, आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतही वाढत आहे. यामुळे सीएनजीच्या दरात स्थानिक पातळीवर वाढ झाली असून, ही वाढ नाममात्र ९० पैसे प्रतिकिलो आहे. सीएनजीचा दर आता प्रतिकिलो ८५.९० रुपये झाला असला तरी त्यातून पुण्यातील मोटारचालकांची पेट्रोलच्या तुलनेत ४९ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत २७ टक्के बचत होत असून रिक्षाचालकांची २९ टक्के बचत होत आहे.
याआधी जुलै महिन्यात सीएनजीचे दर वाढले होते. सध्या इंधनाचे दर वाढले असून पेट्रोल आणि डिझेल महागल्याने वाहनचालक पर्यावरणपूरक सीएनजीला पसंती देत आहेत. मात्र, आता सीएनजीचे दरही वाढू लागले आहेत. पुण्यात जुलैमध्ये सीएनजीच्या दरात प्रतिकिलो दीड रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सीएनजीचा दर त्यावेळी प्रतिकिलो ८५ रुपयांवर पोहोचला होता. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनाचालकांच्या खिशाला झळ बसत आहे.