पुणे शहरात सीएनजीच्या दरात बुधवारपासून (१६ नोव्हेंबर) किलोमागे एक रुपयाची दरवाढ झाली. त्यामुळे शहरात सीएनजी ९२ रुपये किलो झाला आहे. ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांनी याबाबतची माहिती दिली. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांमध्ये सीएनजीच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे.पुण्यात सर्व रिक्षा आणि पीएमपीच्या गाड्या सीएनजी इंधनावर चालविल्या जातात. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी आर्थिकदृष्ट्या परवडणारा असल्याने यापूर्वी शहरातील अनेक खासगी गाड्या सीएनजीवर परावर्तित करण्यात आल्या आहेत. काही नागरिकांकडून नव्यानेही सीएनजी इंधनावरील वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. मात्र, पेट्रोल, डिझेलप्रमाणे सीएनजीच्या दरातही गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. केंद्र शासनाने ऑगस्टमध्ये करामध्ये कपात केल्याने सीनजीचे दर किलोमागे चार रुपयांनी कमी झाले होते. मात्र, तीन महिन्यातील दरवाढीनंतर दर पुन्हा पूर्ववत झाले आहेत.

हेही वाचा >>>पुणे: ‘एनसीएल’चे डॉ. विनोद प्रभाकरन यांना द रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचा सन्मान

यंदाच्या वर्षी जुलैच्या पंधरवड्यापर्यंत पुण्यात सीएनजीचे दर ८५ रुपये होते. ऑगस्टच्या १५ तारखेपर्यंत त्यात तब्बल सहा रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे महिन्यातच सीएनजीचे दर किलोमागे ९१ रुपये झाले होते. नागरिकांचा त्याबाबत संताप लक्षात घेऊन सीएनजीच्या दरात १६ ऑगस्टपासून चार रुपयांची कपात करण्यात आली. त्यामुळे सीएनजीचा दर ८७ रुपये झाला होता. मात्र, गेल्या तीन महिन्यांत त्यात पुन्हा चार रुपयांची वाढ होऊन हा दर ९१ रुपयांवर आला होता. बुधवारी झालेल्या एक रुपयाच्या दरवाढीमुळे पुण्यात आता सीएनजीचा दर किलोमागे ९२ रुपये झाला आहे.