पुणे : सीएनजीच्या दरामध्ये पुन्हा वाढ झाली असून, गुरुवारपासून (४ ऑगस्ट) पुणे शहरात सीएनजीचा दर नव्वदीपार गेला. एकाच दिवसांत किलोमागे तब्बल सहा रुपयांची वाढ झाल्याने शहरात सीएनजीचा दर ९१ रुपये किलो झाला आहे. सुमारे तीन महिन्यांत सीएनजी १६ रुपयांनी महागला आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ रिक्षा पंचायतीकडून आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येणार असून, ९ ऑगस्टला क्रांतिदिनी मोर्चा काढण्यात येणार आहे.
गेल्या वर्षापर्यंत ७० ते ७५ रुपयांच्या आसपास असलेला सीएनजीचा दर गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये झपाट्याने वाढला आहे. शहरातील सर्व रिक्षा सध्या सीएनजीवर धावत आहेत. त्याचप्रमाणे पेट्रोलच्या तुलनेत कमी खर्च असल्याने अनेक खासगी मोटारीही सीएनजी इंधनावर परावर्तित करण्यात आल्या आहेत. या नागरिकांना दरवाढीचा फटका बसत आहे. सीएनजीची दरवाढ सुरू असल्याने रिक्षा संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यानुसार रिक्षासाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून भाडेवाढही जाहीर करण्यात आली होती. मात्र, रिक्षा चालकांनी त्याबाबत काही आक्षेप नोंदिवल्याने ती स्थगित करण्यात आली आहे. पुढील बैठकीत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
सीएनजीच्या दरामध्ये होणाऱ्या सततच्या दरवाढीमुळे रिक्षा पंचायतीकडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी क्रांतिदिनी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या काळात सकाळी साडेदहा ते दुपारी एकपर्यंत रिक्षा बंद ठेवण्यात येणार आहेत. या दरवाढीस केंद्र सरकार पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोपही रिक्षा पंचायतीकडून करण्यात आला आहे.
पेट्रोल, डिझेलचीही दरवाढ सुरू
गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थित होते. राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर करात कपात करून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देण्यात आला. मात्र, या दोन्ही इंधनांचीही दरवाढ गुरुवारपासून काही पैशांनी पुन्हा सुरू झाली आहे. सोमवारी पेट्रोल ८ पैसे, तर डिझेलच्या दरात ७ पैशांनी वाढ झाली. त्यानंतर शहरात पेट्रोल प्रतिलिटर १०५.९१ रुपये, तर डिझेलचा दर ९२.४३ रुपये झाला.