पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ४२ सीएनजी पंप चालकांना गुजरातमधील टोरेंट गॅस कंपनी सीएनजीचा पुरवठा करते. मात्र, शासनाने मंजूर केलेले कमिशन देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने शुक्रवारपासून (२७ जानेवारी) हे पंप चालक बेमुदत बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी पुणे जिल्ह्यात सीएनजी वर चालणाऱ्या वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
हेही वाचा- पुणे : दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणातील तीन मृतांचे पुन्हा शवविच्छेदन
केंद्र शासनाने सीएनजी वितरकांसाठी वाढीव सेवामूल्य (कमिशन) जाहीर केले आहे. पुणे शहराला सीएनजी पुरवठा करणार्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने वाढीव सेवामूल्य विक्रेत्यांना दिले. मात्र, ग्रामीण भागात पुरवठा करणार्या टॉरेंट कंपनी व्यवस्थापन देण्यास टाळाटाळ करत आहे. याबाबत यापूर्वीही विक्रेत्यांनी संप पुकारला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी विक्रेते आणि कंपनी व्यवस्थापनाची बैठक घेतली होती. त्यात कंपनीच्यावतीने सेवामूल्य देण्यासाठी वेळ मागून घेतला होता. पुन्हा दुसर्यांदा वेळ वाढून देण्यात आली. मात्र, सेवामूल्य दिले जात नाही, कधीपर्यंत देणार हे सांगितले जात नाही, त्यामुळे विक्रेत्यांनी संपाची हाक दिली आहे, असे पेट्रोल पंप चालक संघटनेचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी सांगितले.
सन २०२१ मध्ये सीएनजी डीलर्सना फेअर ट्रेड मार्जिन (कमिशन) जारी करण्यात आले. मात्र, पुणे ग्रामीण भागात गॅस पुरवठा करणार्या टोरेंट गॅस कंपनीला (Torrent Gas Company) अनेकवेळा विनंती करूनही त्यांनी कमिशन दिले नाही. पुणे जिल्ह्यातील सीएनजी वितरकांचे आजपर्यंत जवळपास आठ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कमिशन देऊनये, यासंबंधी केंद्र शासनाकडून कोतेही आदेश आलेले नाहीत, असे असताना टाळाटाळ केली जात आहे, असेही रुपारेल यांनी सांगितले.
हेही वाचा- ‘कोयत्या गँग विरोधात मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू’; चंद्रकांत पाटील यांची माहिती
पुणे शहरातील सर्व सीएनजी पेट्रोल पंप खुले आहेत. टोरेंट गॅसचा पुरवठा होणारी पुणे शहराबाहेरील सीएनजी स्थानके बंद आहेत. एमएनजीएलची पुणे शहरातील स्थानके नियमितपणे खुली आहेत, अशी माहिती ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ता अली दारुवाला यांनी दिली.