प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीने न्यायालयाच्या सूचनेनुसार ‘सीएनजी’ इंधन वापरण्याची सक्ती रिक्षांना करण्यात आली. पेट्रोलपेक्षा सीएनजी स्वस्त असल्याने बहुतांश रिक्षा सीएनजीवर परावर्तित झाल्या. शहरातील खासगी वाहनेही मोठय़ा प्रमाणावर सीएनजी इंधनावर चालविली जातात. रिक्षाला सीएनजीचा वापर सक्तीचा करून पाच वर्षे उलटून गेली आहेत. पण, वाहनांच्या तुलनेत हव्या त्या प्रमाणात आजही सीएनजी उपलब्ध होत नाही.. मागील काही दिवसांपासून पुन्हा सीएनजीची बोंबाबोंब सुरू झाली असून, रिक्षाचालक मेटाकुटीला आले आहेत. अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन आश्वासने दिली, पण आश्वासनानुसार उपाय न झाल्यास रिक्षा पंचायतीने आंदोलनाचीही तयारी ठेवली आहे.
शहरांतर्गत वाहतूक करणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीतील वाहनांना टप्प्याटप्प्याने सीएनजी इंधनाची सक्ती करण्यात आली आहे. रिक्षाला सुरुवातीला २००६ मध्ये एलपीजी इंधनाची सक्ती करण्यात आली. त्यानंतर २००९ मध्ये सीएनजीची सक्ती करण्यात आली. एलपीजीच्या पुरवठय़ाचीही बोंबाबोंबच होती. सीएनजी आल्यामुळे परिस्थितीत सुधारणा होईल, अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरली. सीएनजीच्या पुरवठय़ातही ही बोंबाबोंब सुरूच राहिली. मध्यंतरी सीएनजीच्या पंपांची संख्या वाढविण्यात आली. पण, वाढत्या वाहनांच्या तुलनेत ती अपुरीच ठरली. त्यामुळे रिक्षा चालकांना सध्या सीएनजी भरण्यासाठी चार ते पाच तास रांगेत थांबावे लागते.
सीएनजी भरण्यासाठी मोठा वेळ रांगेतच जात असल्याने व्यवसायावरही त्याचा परिणाम होतो. ही परिस्थिती कायम असताना मागील पंधरा ते वीस दिवसांपासून शहरात सीएनजीची स्थिती आणखी बिकट झाली आहे. मागणी व पुरवठय़ाचे गणित कोलमडून पडले आहे. त्याचा सर्वात मोठा फटका रिक्षा व्यवसायाला बसत आहे.   कासारवाडी येथील सीएनजीचा ऑनलाइन पंप काही दिवसांपासून बंद आहे. नरवीर तानाजी वाडी येथे असलेला ऑनलाइन पंप दिवसाही खासगी वाहनांना सीएनजी भरण्यासाठी खुला केला आहे. त्यामुळे या पंपावरील ताण वाढून रिक्षांच्या रांगेमध्ये वाढ झाली आहे. सध्या सुरू असलेले सीएनजी पंप अपुरे पडत आहेत. या पंपांची वेळही वाढविण्याची आवश्यकता आहे.
सीएनजीच्या पुरवठय़ाच्या स्थितीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने रिक्षा पंचायतीच्या वतीने नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्या वेळी प्रशासनाच्या वतीने सीएनजी पुरवठय़ातील सुधारणेबाबत आश्वासने देण्यात आली आहेत. या आश्वासनानुसार कार्यवाही करण्यासाठी आठवडाभर वाट पाहण्याची रिक्षा पंचायतीची तयारी आहे. मात्र, त्यानंतर आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल, असा इशाराही पंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.
सीएनजी व एलपीजीची सक्ती केली असल्यामुळे या इंधनाचा योग्य प्रकारे पुरवठा करण्याची जबाबदारी सरकारची आहे. हा पुरवठा होत नसल्याने हे प्रशासन व राजकारण्यांचे अपयश आहे. त्यांच्या अपयशाची शिक्षा सध्या रिक्षा चालक भोगतो आहे. मागेही या प्रश्नावर आम्ही आंदोलन केले होते. मात्र या पुढे निकराची भूमिका घ्यावी लागेल. प्रशासनाने काही आश्वासने दिली आहेत. त्यानुसार कार्यवाही न झाल्यास बंदसारखा निर्णय घेणे आम्हाला भाग पडेल.
– नितीन पवार, रिक्षा पंचायत, निमंत्रक

Story img Loader