पुणे : पुणे शहर, ग्रामीण भाग आणि पिंपरी-चिंचवड शहरात सीएनजी पंपांवर गेल्या तीन दिवसांपासून सीएनजीचा अपुरा पुरवठा होत आहे. यामुळे पंपचालकांना सीएनजी विक्री बंद ठेवावी लागत आहे. सीएनजीच्या टंचाईमुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत असून, तब्बल सात ते आठ तास पंपावरील रांगेत थांबावे लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे जिल्ह्यात टोरंट कंपनीकडून सीएनजीचा पंपांना पुरवठा केला जातो तर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) सीएनजी पुरवठा केला जातो. त्यामुळे एमएनजीएलचे पंप शहरात आणि टोरंट कंपनीचे पंप ग्रामीण भागात आहे. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही कंपन्यांकडून पंपांना पुरेसा सीएनजीचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पंपचालकांना सीएनजी विक्री बंद ठेवावी लागत आहे. सीएनजीसाठी वाहनचालकांना सुमारे सात ते आठ तास रांगेत थांबावे लागत आहे.

आणखी वाचा-म्हाडा लॉटरीसाठी अर्ज केला का? राहिले शेवटचे नऊ दिवस

एमएनजीएलच्या मुख्य गॅसवाहिनीच्या दुरुस्तीचे काम १८ मे रोजी रात्री १० ते १९ मे रात्री १० वाजेपर्यंत केले जाणार होते. याबाबत कंपनीने पंपचालकांना सूचना दिलेलही होती. त्यात मुख्य वाहिनीच्या दुरूस्तीमुळे सीएनजी पुरवठा अनियमित होण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, आता दुरूस्ती पूर्ण होऊन दोन दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही शहरातील पंपांवर सीएनजीचा पुरवठा पुरेशा दाबाने होत नाही. त्यामुळे अनेक पंपचालकांना सीएनजी विक्री बंद ठेवावी लागत आहे.

मागील काही काळापासून सीएनजी हे परवडणारे इंधन असल्याने अनेक वाहनचालक त्याकडे वळले आहेत. सीएनजीचा अपुरा पुरवठा असल्याने वाहनचालकांना फटका बसत आहे. त्यांना तासनतास पंपावर रांगेत उभे राहावे लागत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पंपावरील वाहनांच्या रांगा रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी होत असल्याचे प्रकारही घडत आहेत. वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून पंपचालकांना धारेवर धरण्याचे प्रकार घडत आहेत.

आणखी वाचा- “गरिबांचा एक अन् श्रीमंतांचा एक असे दोन…”, पुण्यातील अपघातावरून राहुल गांधींची उद्विग्न प्रतिक्रिया

सीएनजीचा पुरवठा होत नसल्याने पंपचालकांना विक्री बंद ठेवावी लागत आहे. याबाबत आम्ही जिल्हा प्रशासनाकडेही तक्रार दिलेली आहे. सीएनजी पुरवठ्यात खंड पडणार असेल तर कंपन्यांनी आधी पूर्वसूचना देणे आवश्यक होते. मात्र, कंपन्यांकडून ही खबरदारी घेतली जात नाही. -ध्रुव रूपारेल, अध्यक्ष, पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशन

सीएनजीचा अपुरा पुरवठा होत असल्याची तक्रार पंपचालकांनी केली आहे. याचबरोबर पुणे जिल्ह्यात सीएनजीसाठी मोठ्या रांगा लागत असल्याचे चित्र आहे. यामुळए सीएनजीचा पुरेसा पुरवठा करावा, असे पत्र पुरवठादार कंपन्यांना दिले आहे. -प्रशांत आवटे, जिल्हा पुरवठा अधिकारी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cng shortage for pune residents drivers have to wait in the queue for eight hours pune print news stj 05 mrj