पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि शहराभोवतलच्या परिसरात सध्या सीएनजी पंपांवर सीएनजीचा अपुरा पुरवठा होत आहे. यामुळे पंपचालकांना सुमारे सहा तास पंप बंद ठेवावे लागत आहेत. यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत असून, पर्यायाने सीएनजी उपलब्ध असलेल्या शहरांतील पंपावर जास्त गर्दी होत आहे.
पुणे जिल्ह्यात टोरंट कंपनीकडून सीएनजीचा पंपांना पुरवठा केला जातो तर पुणे शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) सीएनजी पुरवठा केला जातो. त्यामुळे एमएनजीएलचे पंप शहरात आणि टोरंट कंपनीचे पंप ग्रामीण भागात आहे. शहराची हद्द विस्तारली असल्यामुळे भोवतालच्या परिसरातही अनेक टोरंट कंपनीचे पंप कार्यरत आहेत. मागील सहा महिन्यांपासून टोरंट कंपनीकडून पंपांना पुरेसा सीएनजीचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पंपचालकांना सुमारे सहा तास पंप बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे.
आणखी वाचा-सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; पत्रात ललित पाटील प्रकरणाची धक्कादायक माहिती असल्याचा दावा
मागील काही काळापासून सीएनजी हे परवडणारे इंधन असल्याने अनेक वाहनचालक त्याकडे वळले आहेत. सीएनजीचा अपुरा पुरवठा असल्याने वाहनचालकांना फटका बसत आहे. त्यांना तासनतास पंपावर रांगेत उभे राहावे लागत आहे. शहराभोवतालच्या परिसरात टोरंटच्या पंपावर सीएनजी नसल्याने शहरातील एमएनजीएलच्या पंपावर वाहनचालकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पंपावरील वाहनांच्या रांगा रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी होत असल्याचे प्रकारही घडत आहेत.
पंपचालकांचा संपाचा इशारा
पंपचालकांना वाढीव कमिशन देण्याचा निर्णय आधी झाला होता. या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. याबाबत सर्व घटकांची तातडीने बैठक घेण्यात यावी. पंपचालकांना वाढीव कमिशन न मिळाल्यास संप केला जाईल, असा इशारा पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणेचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी दिला.
आणखी वाचा-शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती, ऑनलाइन नोंदवण्यास सुरुवात
पंपांना सीएनजीचा पुरेसा पुरवठा करावा, असे पत्र टोरंट कंपनीला पाठविण्यात आले आहे. पुरवठा सुरळीत न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून कंपनी आणि पंपचालकांची बैठक घेतली जाईल. पंपचालकांच्या वाढीव कमिशनचा विषय केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारीतील आहे. -सीमा होळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी
सीएनजीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने पंपचालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. याचबरोबर वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. पंप बंद केल्यास आम्हाला जीवनावश्यक वस्तू कायदा लावला जातो, त्याप्रमाणे सीएनजीचा पुरेसा पुरवठा न करणाऱ्या कंपनीवरही प्रशासनाने कारवाई करावी. -ध्रुव रूपारेल, अध्यक्ष, पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणे