शहरातील बहुतांश रिक्षा आता ‘सीएनजी’वर धावत असून, पेट्रोलपेक्षा ‘सीएनजी’वर येणारा खर्च कमी असल्याने अनेक व्यावसायिक वाहनेही मोठय़ा प्रमाणावर या इंधनावर परावर्तित करण्यात आली आहेत. त्यामुळे सीएनजीच्या पंपाची निकड भविष्यात वाढतच जाणार आहे. मध्यंतरी रिक्षा संघटनांनी घेतलेल्या आंदोलनात्मक पावित्र्यानंतर सीएनजीची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये सीएनजीचा एकही पंप नाही. त्यामुळे आता मध्यवर्ती भागात असलेल्या इंधन पंपांवर सीएनजी आणण्याबाबत चाचपणी करण्यात येत असून, लवकरच मध्य भागातही सीएनजी उपलब्ध होऊ शकेल.
पाच वर्षांपूर्वी न्यायालयाच्या सूचनेनुसार शासनाने रिक्षांना सीएनजीची सक्ती केली. ही सक्ती झाल्यानंतर हळूहळू शहरातील बहुतांश रिक्षा सीएनजीवर परावर्तित करण्यात आल्या. मात्र, सीएनजीवरील वाहनांची संख्या वाढत असताना सीएनजीचा पुरवठा मात्र विस्कळीत होत राहिला. रिक्षा चालकांना सीएनजी भरण्यासाठी पाच ते सहा तास रांगेत थांबावे लागते. अनेकदा आंदोलनात्मक पवित्रा घेऊनही पुरवठय़ात फरक पडला नाही. सक्ती केली असल्याने सीएनजी योग्य प्रमाणात देण्याची जबाबदारी सरकार व प्रशासनाची आहे. रिक्षा पंचायतीने आंदोलनात्मक पवित्रा घेतल्यानंतर प्रशासनाकडून सीएनजी पुरवठा सुरळीत करण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या.
सध्या वारजे येथे दोन, निगडी व चाकण येथेही प्रत्येकी दोन, तर उंड्री, पिसोळी, वाघोली, वाकड, नाशिक रस्ता, कोथरूड, हडपसर येथे सीएनजीचे पंप आहेत. त्याचप्रमाणे वर्षभरात आणखी नऊ पंप सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सीएनजी पुरवठय़ातील सुधारणेचा एक भाग म्हणून वारजे येथील २४ तास सुरू राहणारा सीएनजीचा ऑनलाईन पंप काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आला.
सीएनजीचा पुरवठा सुधारणेच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असताना भविष्यातील गरज लक्षात घेता शहरात आणखी सीएनजी पंपांची गरज भासणार आहे. सध्या सीएनजीचा एकही पंप शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये नाही. या भागातही पंप सुरू करण्याची मागणी आहे. शहरातील सर्वच पंपांवर एकतरी सीएनजी युनिट असावे, अशी मागणी नोंदविण्यात येत आहे. पूर्वीच्या एलपीजी इंधनाच्या पंपांवर सीएनजीचे युनिट सुरू करता येऊ शकते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या पाहणी समितीला निदर्शनास आले आहे. रिक्षा संघटना व प्रशासनाच्या दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत हा विषय चर्चेला आला होता. त्यामुळे या दृष्टीने कारवाई करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळात शहराच्या मध्य भागातही सीएनजीची उपलब्धता होऊ शकणार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा